बीड सैराट खून प्रकरणी 27 जणांची चौकशी; माजी मंत्र्याच्या घराचीही झडती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

सुमित वाघमारे ऑनर किलींग प्रकरणात पोलिसांनी मुख्य दोन आरोपींसह कट रचणाऱ्या एक अशा तिघांना अटक करण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 27 जणांची चौकशी केली. तर, एका माजी मंत्र्याच्या घराचीही झडती घेतली आहे. माजी मंत्री कोण, अशी चर्चा आता बीडमध्ये सुरु झाली आहे.

बीड : येथील सुमित वाघमारे ऑनर किलींग प्रकरणात पोलिसांनी मुख्य दोन आरोपींसह कट रचणाऱ्या एक अशा तिघांना अटक करण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 27 जणांची चौकशी केली. तर, एका माजी मंत्र्याच्या घराचीही झडती घेतली आहे. माजी मंत्री कोण, अशी चर्चा आता बीडमध्ये सुरु झाली आहे.

येथील आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सुमित वाघमारे आणि भाग्यश्री लांगडे या दोघांनी दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. यामुळे मनात राग धरुन बुधवारी (ता. 19) भाग्यश्री समोरच तिचा भाऊ बालाजी लांडगेने सुमितवर धारधार शस्त्राचे वार करुन खुन केला.

दरम्यान, या प्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बीड, औरंगाबाद, अहमदनगर या ठिकाणी विविध 27 जणांची चौकशी केली. या चौकशीमध्यचे कृष्णा रवींद्र क्षीरसागर हा या प्रकरणाचा कट रचणारा आणि आरोपींना फरार करण्याची भूमिका बजविणारा असल्याचे समोर आल्याने त्याला सोमवारी (ता. 24) अटक केली होती. दरम्यान, पोलिसांनी विविध घरांची झडती घेतली. यामध्ये एका माजी मंत्र्यांच्या औरंगाबाद येथील घराचीही झडती घेतली.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनीच पत्रकार परिषदेत या माहितीला दुजोरा दिला. आता हे माजी मंत्री कोण, याची चर्चा बीडमध्ये सुरु झाली आहे. मुख्य आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांना बीडच्या पोलिसांनी बडनेर (जि. अमरावती) येथून अटक केली.

Web Title: 27 accused in Beed Sairat murder case