Sengav Map
Sengav Map

तालुकानिर्मितीला उलटले २७ वर्ष तरीही समस्या कायम

सेनगाव ः हिंगोली तालुक्‍यातून विभागणी होऊन १५ ऑगस्‍ट १९९२ साली स्‍वतंत्र सेनगाव तालुक्‍याची निर्मिती होऊन जवळपास सत्तावीस वर्षे पूर्ण होत आहे. तालुका निर्मितीच्‍या प्रदीर्घ कालावधीच्‍या तुलनेत विकासाला गती आली नाही. परिणामी अनेक समस्या कायम आहेत.

हिंगोली तालुक्‍यातून विभागणी होत सेनगाव तालुक्‍याची निर्मिती झाली असून १८० गावांचा समावेश करण्यात आला. तालुका झाल्‍यानंतर या भागाचा झपाट्याने विकास होईल ही अपेक्षा गावकऱ्यांना होती. म्‍हणावा तसा विकास झालाच नाही. येथे आजही औद्योगिक वसाहत, विविध शासकीय कार्यालयांना स्‍वतंत्र जागेअभावी एकप्रकारे खिळ बसली आहे. 

अतिदुर्गम व डोंगराळ भाग जास्‍त

या भागात लघू व कुटीर उद्योग टाकण्यासाठी औद्योगिक वसाहत स्‍थापन झाली नाही. त्‍यामुळे व्यावसायिकांना जागेच्‍या प्रमुख कारणामुळे स्‍थानिक भागात उद्योग सुरू करता येत नाही. तालुक्‍यात अतिदुर्गम व डोंगराळ भाग जास्‍त आहे. हलक्‍या व कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र जास्‍त आहे. सिंचन क्षेत्र कमी असल्‍याने निसर्गावर आधारित शेती शेतकऱ्यांना करावी लागते. त्‍यासोबत जोड व्यवसाय नसल्‍याने शेतकऱ्यांचा विकास होत नाही.

रोजगाराच्‍या शोधासाठी इतरत्र स्‍थलांतर

तालुक्‍यात छोट कारखाने, लघू व कुटीर उद्योग नाहीत. खरीप हंगामानंतर अनेक खेडेगावांतील मजुरांना रोजगाराच्‍या शोधासाठी इतरत्र शहरात स्‍थलांतर करावे लागते. कुशल कामगार, मजुरदारांना स्‍थानिक भागात रोजगार मिळण्यासाठी विशेष प्रयत्‍न झाले नाहीत. त्‍यामुळे मिळेल त्‍या ठिकाणी रोजगारासाठी जावे लागते. बऱ्याचदा इतरत्र अपेक्षित कामे उपलब्‍ध होत नसल्‍याने कमी मोबदल्‍यावर कामे मजुरांना करावी लागतात.

विविध विभागाच्या प्रशस्‍त इमारतीचा प्रश्न प्रलंबित

तालुक्‍याच्‍या ठिकाणी औद्योगिक वसाहतीची स्‍थापना झाली नाही. काही महिन्यांपूर्वी यासाठी पाठपुरावा झाला होता. त्‍यानंतर संबंधित विभागाच्‍या पथकाकडून जागा पाहणीची प्रक्रिया झाली. त्‍या वेळी बरडा-लिंगदरी परिसरातील शासकीय गायरान जमीन स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी दाखवली. मात्र, संबंधित जमीन सपाट नसल्‍याने हा प्रश्न मार्गी लागला नाही. तालुका ठिकाणी बसस्‍थानक उद्‌घाटनानंतर तिळमात्र सुधारणा झाली नाही. पोलिस ठाणे, न्यायालयासाठी स्‍वतंत्र जागा उपलब्‍ध न झाल्‍याने प्रशस्‍त इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे.

मुलींसाठी स्‍वतंत्र शाळाही नाही

येथे मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. मात्र, मुलींचे शासकीय वसतिगृह नसल्‍याने ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी ये-जा करावी लागते. येथे मुलींचे वसतिगृह मंजूर झाले होते. मात्र, निधी व राजकीय गटबाजीमुळे ते येऊ शकले नाही. त्‍यामुळे हे वसतिगृह इतरत्र गेले. तसेच मुलींसाठी स्‍वतंत्र शाळाही नाही.

शिक्षण, आरोग्‍य, कृषी विभागाचा विकास अद्यापही नाही
-----------------
मराठवाडा-विदर्भ सीमेवरील या तालुक्‍याच्‍या निर्मितीला २७ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला असून शिक्षण, आरोग्‍य, कृषी विभागाचा अपेक्षित विकास झाला नाही. या भागातील नागरिकांचा मानवी जीवन उंचावण्यासाठी तालुक्‍याची मानव विकास मिशनमध्ये काही वर्षांपूर्वी निवड झाली होती. त्‍यानंतरही अपेक्षित विकास झालाच नाही. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्‍या उदासीन धोरणामुळे तालुक्‍याचा विकास झाला नाही, असा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

शेतीचा विकास खुंटला
तालुका निर्मितीनंतर विविध क्षेत्रात विकास होईल, ही अपेक्षा होती. मात्र, असे झाले नाही. स्‍थानिक भागात रोजगारांना रोजगार नसल्‍याने स्‍थलांतरित होण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सिंचन क्षेत्रात वाढ न झाल्‍याने शेतीचा विकास खुंटला. अधिकारी व लोकप्रतिधिनींच्‍या उदासीन धोरणाचा फटका तालुका विकासाला बसला आहे. - गंगाराम फटांगळे, सेनगाव. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com