संभाजी निलंगेकरांसह २९ जण निर्दोष

Sambhaji-Patil-Nilangekar
Sambhaji-Patil-Nilangekar

निलंगा - अंबुलगा (ता. निलंगा) येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्याच्या तेरा वर्षांपूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर काही पोलिसांसह अनेकजण जखमी झाले होते. या प्रकरणी तत्कालीन आमदार व विद्यमान कौशल्य विकास, कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह २९ जणांची येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ डिसेंबर २००६ ला कारखानास्थळी होती. कारखाना डॉ. निलंगेकर यांच्या समर्थकांच्या ताब्यात होता. आजोबा, नातवांतील राजकीय संघर्ष पेटलेला असतानाच सभेला तत्कालीन आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार असल्याची कुणकुण लागली.

त्यामुळे कारखाना प्रशासन, पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. सभेला दोन्ही गटांचे कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजी पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केल्यावर शाब्दिक बाचाबाचीनंतर गोंधळ सुरू झाला. संभाजी पाटील निलंगेकर सभात्याग करून निघून जात असताना गोंधळ वाढला. लोक सैरावैरा धावू लागले. विश्वनाथ लांबोटे या शेतकऱ्याचा गोंधळादरम्यान मृत्यू झाला होता. तर अनेक शेतकरी, काही पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले होते. दरम्यान, गोंधळ काबूत आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. 

या प्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, पंचायत समितीचे सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, विनोद आर्य, ईश्वर पाटील, दगडू सोळुंके, सत्यवान धुमाळ, चंदर पाटील यांच्यासह २९ जणांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. पठाण यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. विधी व न्याय विभागाचे अतिरिक्त संचालक, जिल्हाधिकारी, पोलिस विभागाच्या संयुक्त समितीने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवरील गुन्ह्याबाबत दिलेल्या अहवालानुसार न्यायालयाने पालकमंत्री निलंगेकर यांच्यासह २९ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. ॲड. सी. जे. सबनीस यांनी निलंगेकर यांची बाजू मांडली. त्यांना ॲड. हेमंत गायकवाड, ॲड. सुनील माने, ॲड. एम. के. वलांडे यांनी साह्य केले.

माझ्यावर वैयक्तिक स्वरूपाचा एकही गुन्हा नाही. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देताना काही गुन्हे दाखल झाले आहेत. हा गुन्हाही ऊसउत्पादकांसाठीच्या लढ्याचा होता. त्यामुळेच शासनाच्या समितीने चौकशी करून अहवाल दिल्याने माझी व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाली. न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे.
- संभाजी पाटील निलंगेकर, कामगारमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com