29 July 2019 क्राइमनामा : औरंगाबाद शहरात कुठे, काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

औरंगाबाद शहरात सोमवारी (ता. 29) विविध पोलिस ठाण्यांमध्ये मारहाण, अपघात, चोरी यासह इतर गुन्ह्यांची नोंद झाली. त्याच्या एकत्रित बातम्या.

औरंगाबाद शहरात सोमवारी (ता. 29) विविध पोलिस ठाण्यांमध्ये मारहाण, अपघात, चोरी यासह इतर गुन्ह्यांची नोंद झाली. त्याच्या एकत्रित बातम्या.
 
महिलेला मारहाण करून मोबाईल पळविला 
मारहाण करून घरातून तरुणाने मोबाईल पळविल्याची तक्रार महिलेने दिली. त्यानुसार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. लक्ष्मीबाई डेरे रामनगर येथे राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अक्षय कोल्हे (वय 23) असे संशयिताचे नाव आहे. त्याने डेरे यांच्या घरातून नातवाचा मोबाईल लंपास केला. ही बाब दिसल्यानंतर लक्ष्मीबाई यांनी त्याला विचारणा केली असता, त्याने शिवीगाळ करून हातातील कड्याने डोक्‍याला मारहाण केली. अशा तक्रारीनुसार या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
हर्सूल परिसरातून दुचाकीची चोरी 
राजेंद्र पद्माकर कांबळे (रा. हडको, एन- 11, सुदर्शननगर) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना हर्सूल तलावाजवळील शासकीय वसतिगृहात साडेपाचच्या सुमारास घडली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

बसस्थानकातून मोबाईल लंपास 
बसस्थानकातील चौकशी कक्षातील व्यक्तीशी बोलताना चोराने राम भगवान तरटे (रा. सिडको, एन- सहा) यांचा मोबाईल लीलया लंपास केला. ही घटना घडली. याबाबत तरटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
तलवार बाळगणारा ताब्यात 
तलवार बाळगल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी तलवार जप्त केली. ही कारवाई सायंकाळी कासंबरी दर्गा, पडेगाव येथे करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार शेख कदीर ऊर्फ समीर बंटा शेख शफिक (रा. कासंबरी दर्गा) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
गतीचा नियम मोडला, चालकावर गुन्हा 
भरधाव कंटेनर चालवून गतीचा नियम मोडल्याप्रकरणी चालकाविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सुंदर शेषेराव डोंगरे (वय 35, रा. सावरगाव) असे चालकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मस्के पेट्रोलपंपाजवळ वाहतूक पोलिसांनी भरधाव वेगाने जाणारा कंटेनर अडविला. पादचारी व इतर वाहनांना धडक बसेल अशा पद्धतीने कंटेनर चालवीत होता. 
 
हद्दपाराला पकडल्याने स्वतःलाच केले जखमी 
खासदार इम्तियाज जलील यांच्या पदयात्रेत गोंधळ घालण्याच्या शक्‍यतेवरून पोलिसांनी हद्दपार तरुणाला ताब्यात घेतले. त्यावेळी आरडाओरड करून त्याने डोक्‍याला मारून घेतले. ही घटना कटकट गेट येथे सायंकाळी घडली. शेख अलीम शेख शौकत (रा. बायजीपुरा) असे संशयिताचे नाव आहे. डोक्‍याला मारून घेतल्याने तो जखमी झाला. घाटीत त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. तरीही तो शहरात वास्तव्य करीत होता. त्याच्याविरुद्ध जिन्सी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. 
 

जनावरे चोरणारे दोघे गजाआड 
ग्रामीण भागातील जनावरे चोरून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून टेंपो, दुचाकी, मोबाईल व जनावरे विक्री करून मिळालेली रोकड असा सात लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (ता. 27) पहाटे केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली. 

नशेच्या गोळ्यांसह एकाला अटक 
नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सायंकाळी होलीक्रॉस शाळेजवळ अटक केली. शेरखान नन्हेखान (42, काझी मोहल्ला, कन्नड) असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्याजवळून सुमारे दीडशे स्ट्रीप नशेच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आणि त्याची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. 
गुन्हे शाखेला होलीक्रॉस शाळेच्या भागात एक व्यक्ती नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नंदकुमार भंडारे हे स्टाफसह आणि अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांच्यासह त्या ठिकाणी पोचले. सापळा रचलेला असतानाच सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक व्यक्ती दुचाकी (एमएच-20, ईएम-467) वर आली. तिला ताब्यात घेऊन विचारणा केली असता शेरखान नन्हेखान (42, काझी मोहल्ला, कन्नड) असे नाव सांगितले. त्याच्या दुचाकीची झडती
घेतली असता डिक्कीमध्ये नशेच्या गोळ्यांच्या 148 स्ट्रीप आढळल्या. या गोळ्यांची किंमत आठ हजार रुपये असून त्याच्याकडून दुचाकीसह 29 हजार 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेरखान विरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, संतोष सोनवणे, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, रितेश जाधव, लखन गायकवाड, नितीन देशमुख यांनी केली.   

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 29 July 2019 : Crime News in Aurangabad city