यवतमाळ जिल्ह्यात तिघांना जलसमाधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

वणी/पुसद (जि. यवतमाळ) - जिल्ह्यात रविवारी (ता. आठ) नदीनाल्यांना आलेल्या पुरात तिघांना जलसमाधी मिळाली असून एकाचा मृतदेह सापडला; तर दोघांच्या मृतदेहाचा शोध घेणे सुरु आहे. या घटनांमुळे पुसद तालुक्यातील बान्शी व वणी तालुक्यातील मेंढोली येथे शोककळा पसरली आहे.

वणी/पुसद (जि. यवतमाळ) - जिल्ह्यात रविवारी (ता. आठ) नदीनाल्यांना आलेल्या पुरात तिघांना जलसमाधी मिळाली असून एकाचा मृतदेह सापडला; तर दोघांच्या मृतदेहाचा शोध घेणे सुरु आहे. या घटनांमुळे पुसद तालुक्यातील बान्शी व वणी तालुक्यातील मेंढोली येथे शोककळा पसरली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. वणी तालुक्यातील मेंढोली येथील पेटूर नाल्यात सुनील सुभाष भोयर (वय 22) हा युवक वाहून गेल्याची घटना घडली. तो वणी येथील एका दुकानात कामाला होता. काम आटोपून तो आपल्या गावी दुचाकीने मेंढोली येथे जाण्याकरिता निघाला असता पेटूर नाल्याला पूर आल्याने पाणी पुलावरून वाहत होते. त्यांनी दुचाकी काठावर ठेवून पाण्याचा अंदाज घेण्यासाठी पुलावर गेला असता त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात वाहून गेला. याबाबत वणी पोलिसांना कळविण्यात आले असून त्याच्या मृतदेहाचा शोध घेणे सुरू होते. तर, काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत आहे. 

तर, पुसद तालुक्यातील बान्शी येथील नाल्याला आलेल्या पुरात रविवारी सायंकाळी पाच वाजतादरम्यान विनोद लक्ष्मण चिळाल (वय 35) व विकास अनिल आगलावे (वय 19) वाहून गेलेत. रात्री साडेसातपर्यंत विनोदचा मृतदेह हाती लागला असून, विकासच्या मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे. दहा वर्षाच्या आधी बान्शी येथील याच नाल्याचा मोठा पूर आल्याने दोघे वाहून गेले होते, तर शंभरावर घरांना पुराचा वेढा पडल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले होते. या दोन्ही घटनांची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून आवश्यक त्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

Web Title: 3 dead in yavatmal district