एकाचा खून करणाऱ्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 15 मार्च 2019

नांदेड : किरकोळ कारणावरून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून निर्घृण खून करणाऱ्या तिघांना येथील जिल्हा न्यायाधीश सहावे व्ही. के. मांडे यांनी जन्मठेप व प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.    

नांदेड : किरकोळ कारणावरून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून निर्घृण खून करणाऱ्या तिघांना येथील जिल्हा न्यायाधीश सहावे व्ही. के. मांडे यांनी जन्मठेप व प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.    

विष्णुपुरी (नांदेड) येथील राहणारा ज्ञानेश्वर बालाजी हंबर्डे सुनील श्याम भारती आणि आकाश बालाजी बारसे हे तिघेजण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जुना कमानीजवळ 13 मार्च 2017 रोजी दुपारी चारच्या सुमारास दारू पीत बसले होते. यावेळी रामा बळीराम गायकवाड हा दारू पिऊन त्यांच्याजवळ आला. रामा गायकवाड याने ज्ञानेश्वर हंबर्डे याच्यासोबत वाद घातला. सर्व जण दारूच्या नशेत असल्याने ज्ञानेश्वर हंबर्डे यांना बेदम मारहाण केली. तो खाली पडल्यानंतर चाकूने भोसकून त्याचा खून केला.

शासकीय रुग्णालयाच्या बाजूला पडलेल्या ज्ञानेश्वर हंबर्डे याला काही सुज्ञ नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रामा गायकवाड, सुनील भारती आणि आकाश बारसे या तिघांविरुद्ध बालाजी हंबर्डे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फौजदार पी. के. मराडे यांनी तपास करून आरोपींना अटक केली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासले आणि शेवटी शुक्रवारी 15 मार्च रोजी तिघांना जन्मठेप व प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील संजय लाटकर यांनी बाजू मांडली. तर आरोपींचा बचाव परळकर यांनी केला.

या तीनही आरोपींना दर पंधरा दिवसाला न्यायालयीन हजेरीसाठी कारागृहातून आणण्यात येत होते. ३१ डिसेंबर २०१८ या दिवशी घरचा डबा आम्हाला का जेवू देत नाही म्हणून या तिघांनी पोलिसांवर हल्ला केला होता. हा प्रकार न्यायालयाच्या आवारात घडल्याने त्यांच्याविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिक्षा झाल्यानंतर या तीन्ही आरोपींना आमच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी न्यायालयाकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाव पुंडगे यांनी केली आहे.

Web Title: 3 punished for murder