सहस्त्रकुंडात तीन पर्यटक बुडाले; एकाला वाचविण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

मंगळवारी सकाळी नऊवाजेच्या दरम्यान हैदराबाद येथील विद्यार्थी सहस्त्रकुंड पाहण्यासाठी आले होते.

सहस्त्रकुंड : हैदराबाद येथील आठ महाविद्यालयीन विद्यार्थी सहस्त्रकुंड पयर्यटनस्थळ पाहण्यासाठी आले असता, अचानक मुरली येथील धरणाचे पाणी सोडल्यामुळे तीन विद्यार्थी त्यात बुडाले, तर एकाला वाचवण्यात यश आले आहे. ही घटना मंगळवारी (ता.१५) सकाळी घडली.

मंगळवारी सकाळी नऊवाजेच्या दरम्यान हैदराबाद येथील विद्यार्थी सहस्त्रकुंड पाहण्यासाठी आले होते. नेमके आजच्याच दिवशी सहस्त्रकुंडला पाणी नसल्याने चार युवक धबधब्याच्या गाभाऱ्यात उतरले. यावेळी त्यांनी दगडावर कडेला थांबून वाहते पाणी पाहण्याच्या नादात व सेल्फी काढण्याचे नादात रमले. याचवेळी मुरली धरणातून पाणी सोडल्यामुळे या विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यासाठी वेळच मिळाला नाही. तेथील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी बसवलेला अपातकालीन भोंगा वाजविला पण उपयोग झाला नाही आणि मित्रांच्या डोळ्यादेखत ते सर्व जण वाहून गेले.

सहस्त्रकुंड येथील भोई मच्छीमार बाळू चोपलवाड, रामलू घंटलवाड, गोविंद मागीरवाड, पांडुरंग मागीरवाड यांनी कसरत करीत नदीम खान (वय २८) याला वाचवले. पण रफी योदीन (वय २७), अकरम (वय २७), सोहेल (वय २८) हे तिघे सहस्त्रकुंडात बुडाले. त्याचा मृतदेह अद्याप मिळाला नसून इस्लापूर पोलिस ठाण्याचे सह पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, मेथेवाड, पोटे आदी कर्मचारी प्रयत्न करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 Tourist Drowning in Water in Sahastrakund