चाऱ्यातून मेढ्यांना विषबाधा, पालाेद परिसरातील मेंढपाळ संकटात

Aurangabad Gramin News
Aurangabad Gramin News

रहिमाबाद  (जि.औरंगाबाद) :  पालोद (ता. सिल्लोड) परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आणलेल्या मेंढ्यांचा शेतातील सडलेल्या मक्‍याची कणसे, तथा काळी, पांढरी, बुरशी लागलेला चारा खाल्ल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून पंचवीस ते तीस मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.

अनेक पशुपालक मेंढ्या सांभाळतात व त्या चारण्यासाठी गावोगावी फिरत असतात. यंदा सिल्लोड महसूल मंडळात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मका, कापूस, सोयाबीन पिके पाण्यात भिजून त्यांना कोंब फुटले, तर कणसांत काळी, पांढरी बुरशी लागून सडलेल्या अवस्थेत शेतात पडून आहेत. अंधारी (ता. सिल्लोड) येथील शेतकरी लक्ष्मण कोंडिबा दांगोडे हे आपल्या मेंढ्या चारण्यासाठी रविवारी (ता. 17) पालोद परिसरात आले होते.

मेंढपाळ शेतकरी लक्ष्मण दांगोडे यांनी माहिती दिली, की गेल्या तीन-चार दिवसांपासून मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक असून दिवसाकाठी पाच ते सहा मेंढ्यांचा मृत्यू होत आहे. आठ ते दहा मेंढ्यांचे पोट फुगले असून प्रकृती खराब आहे. याबाबतीत शासकीय व खासगी वैद्यकीय अधिकारी अधिक तपासणी करीत आहेत.


याबाबत अन्वी (ता. सिल्लोड) येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी अनिल राठोड यांनी सांगितले, की यंदा मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने परिसरातील चारा पाण्यात भिजल्यामुळे त्यामध्ये पांढऱ्या व काळ्या बुरशीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विषारी आम्लपित्त तयार होऊन ते अन्न जनावरांच्या खाण्यात आल्यावर जनावरांचे आरोग्य बिघडत आहे; तसेच पशुपालकांनी आपल्या जनावरांना चारा देण्याअगोदर चाऱ्यास पूर्णत: वाळल्यावर त्यातील बुरशी नष्ट झाल्यानंतरच जनावरांना टाकावा.


दीड महिन्यांपूर्वी मेंढ्या चारण्यासाठी अंधारी गाव सोडले आहे. दरम्यान, मागच्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोंब फुटलेल्या मक्‍याची कणसे मेंढ्यांच्या खाण्यात आल्याने जवळपास सत्तावीस मेंढ्या मरण पावल्या आहेत. त्यामुळे आमचे सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
- लक्ष्मण दांगोडे, मेंढपाळ, अंधारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com