पाच वर्षांत ३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

सुभाष बिडे 
रविवार, 15 एप्रिल 2018

घनसावंगी - गेल्या पाच वर्षांत दुष्काळी स्थिती, निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी २३ जणांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. उर्वरित दहा शेतकरी कुटुंबीय अनुदानास अपात्र ठरविण्यात आले आहेत. 

घनसावंगी - गेल्या पाच वर्षांत दुष्काळी स्थिती, निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी २३ जणांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. उर्वरित दहा शेतकरी कुटुंबीय अनुदानास अपात्र ठरविण्यात आले आहेत. 

घनसावंगी तालुक्‍यातील ११७ गावांतील ग्रामस्थांचे शेती हेच उत्पन्नाचे मूळ स्रोत आहे. अनेकांचे संसार शेती उत्पन्नावरच चालतात. त्यातूनच मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नकार्यासाठी खर्च करावा लागतो. शेतीत चांगले पिकले, चार पैसे आले तरच शेतकरी चार घास सुखाने खाऊ शकतो अशी परिस्थिती आहे. तालुक्‍यात मागील पाच वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, बोंडअळी, बनावट खते, बी-बियाणे, कमी झालेला मातीचा पोत, शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव, पीकविम्याचे अपुरे संरक्षण, कर्जवाटपातील बॅंकांकडून असमानता अशा अनेक सुलतानी संकटांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त होत आहे. खासगी सावकारांसह विविध सहकारी व राष्ट्रीय बॅंकेचे कर्ज काढून शेतात पेरणी करीत उत्पन्नावर कर्ज फेडून सुखाची स्वप्ने रंगवीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्याने घेतलेल्या कर्जाच्या रकमेच्या व्याजाचा डोंगर मात्र वाढतच आहे. दुसरीकडे शेतातील उत्पन्न शून्य आहे. परिणामी कर्जफेडीसोबत कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा सर्वांत मोठा प्रश्‍न ऐरणीवर असतो. आर्थिक विवंचनेतून अनेकजण टोकाचे पाऊल उचलतात. तालुक्‍यात वर्ष २०१३ पासून आजपर्यंत ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची प्रशासकीय नोंद आहे.

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासन नियमानुसार प्रत्येकी एक लाखापैकी तीस हजार रुपये धनादेश, तर उर्वरित सत्तर हजारांची रक्कम वारसाच्या नावे पोस्ट खात्यात जमा करण्यात आली आहे, ही रक्कम पाच वर्षांनतर वारसदार काढू शकतात. या रकमेवरील मिळणाऱ्या मासिक व्याजातून कुटुंबास आधार मिळावा हा यामागे शासनाचा हेतू आहे.
- संतोष मोरे, नायब तहसीलदार, घनसावंगी

Web Title: 33 farmers suicides in five years