मराठवाड्यात चार महिन्यांत 342 शेतकऱ्यांची आत्महत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मुंबई - मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, जून ते सप्टेंबर 2016 या चार महिन्यांत 342 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायाक माहिती समोर आली आहे. यंदा चांगले पाऊसमान होऊनही शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याने सरकारी यंत्रणाही चक्रावून गेली आहे. 

मुंबई - मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, जून ते सप्टेंबर 2016 या चार महिन्यांत 342 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायाक माहिती समोर आली आहे. यंदा चांगले पाऊसमान होऊनही शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याने सरकारी यंत्रणाही चक्रावून गेली आहे. 

सलग चार वर्षे दुष्काळाचा सामना केल्यानंतर यंदा पावसाने मराठवाड्याला चांगला दिलासा दिला. राज्य सरकारनेही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली. सरकारी मदत वेळेवर मिळूनही शेतकरी आत्महत्या करीत असतील तर ती चिंतेची बाब आहे. या संदर्भात कृषी खात्याकडून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. 

या वर्षी गणेश चतुर्थीनंतर लातूर, बीडसह संपूर्ण मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि पुरामुळे जवळपास 15 लाख हेक्‍टर जमिनीवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आर्थिक नुकसानीचा धक्का सहन न झाल्याने सोयाबीन पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले असावे, असे कृषी खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

जानेवारी 2016 पासून ऑक्‍टोबर अखेरपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारी आकडेवारी सांगते. बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 93 आत्महत्यांची नोंद झाली आहे, तर नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यात प्रत्येकी 58 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

दुष्काळाच्या संकटाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कृषी कर्जाचे पुनर्गठन, खते, बी-बियाणांची उपलब्धता, शेतीला 12 तास वीज पुरवठा आदी मदत केली. पंतप्रधान पीक विमा योजनेत मराठवड्यातील 70 टक्के शेतकरी सहभागी झाले आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्याचे सरकारने ठरवले आहे.

Web Title: 342 farmers have committed suicide in Marathwada within 4 months