वसतिगृह तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

बीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनिवारी दहा तालुक्‍यांत एकाच वेळी झालेल्या तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी आढळले. याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविला असून, शिक्षण विभाग संबंधित मुख्याध्यापकांना नोटिसा बजावणार असल्याची माहिती आहे.

बीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनिवारी दहा तालुक्‍यांत एकाच वेळी झालेल्या तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी आढळले. याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविला असून, शिक्षण विभाग संबंधित मुख्याध्यापकांना नोटिसा बजावणार असल्याची माहिती आहे.

राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ऊसतोड मजूर आहेत. यंदा दुष्काळामुळे मजुरांच्या स्थलांतरात मोठी वाढ झाली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशात ऊसतोडणीसाठी मजूर स्थलांतरित होतात. स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी हंगामी वसतिगृहे चालविली जातात. परंतु हंगामी वसतिगृह स्थानिक शिक्षण समित्या आणि शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांसाठी मलिदा लाटण्याचे साधन बनले आहे; मात्र गेल्या वर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी याला पायबंद घालण्याचा यशस्वी प्रयत्न करीत शासनाचे पाच कोटी रुपये वाचविले होते. दरम्यान, यंदा जिल्ह्यात शिरूर कासार तालुका वगळता इतर दहा तालुक्‍यांत 590 वसतिगृहांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यापैकी 479 वसतिगृहे सुरू झाली. यामध्ये 29 हजार 285 विद्यार्थी असल्याची नोंद असून यात 14 हजार 958 मुले, तर 14 हजार 327 मुली आहेत. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शनिवारी शिक्षण विभागाने एकाच वेळी या वसतिगृहांची तपासणी केली असता साडेतीन हजार विद्यार्थ्यांची तफावत आढळली.

वसतिगृहांच्या तपासणीवेळी एकूण 25 हजार 757 विद्यार्थी आढळून आले. यामध्ये 13 हजार 155 मुले, तर 12 हजार 629 मुलींचा समावेश आहे. एकूण 3 हजार 528 विद्यार्थी कमी आढळून आले.

राज्य समिती 22 पासून जिल्ह्यात
15 जानेवारीला न येऊ शकलेले राज्यस्तरीय तपासणी पथक 22 ते 25 जानेवारीदरम्यान बीड जिल्ह्यात येणार असून, वसतिगृहांची तपासणी करणार आहे.

Web Title: 3500 Student Less in Hostel Checking