मराठवाड्यातील 36 तालुक्‍यांत अवेळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

370 गावांना गारपीट, अवकाळीचा तडाखा
- सहा जणांचा मृत्यू, 22 जण जखमी, 30 जनावरे दगावली

370 गावांना गारपीट, अवकाळीचा तडाखा
- सहा जणांचा मृत्यू, 22 जण जखमी, 30 जनावरे दगावली
औरंगाबाद - मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत बुधवारी (ता.15) अवेळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. 76 पैकी 36 तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली असून, 370 गावांना याचा फटका बसला. दरम्यान, वादळी वाऱ्यासह वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला; तर 22 जण जखमी झाले. शिवाय 30 जनावरे दगावली असल्याचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्य शासनाकडे सादर केला. तसेच येत्या चोवीस तासांत पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मराठवाड्यातील पारा चढल्याने उन्हाचा चटका जाणवण्यास सुरवात झाली होती. मागील पंधरा दिवसांपासून तापमानात चढ- उतार झाला. बुधवारी (ता.15) लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या सहा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट, पाऊस झाला. अवेळी पावसाने मराठवाड्यातील 36 तालुक्‍यांत हजेरी लावली. विभागात सरासरी 3.78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गारपीट, वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रब्बीची पिके काढणीला आलेली असताना अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले. दरम्यान, वीज कोसळून बीड जिल्ह्यात पाच; तर लातूर जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. शिवाय 22 जण जखमी झालेत. यामध्ये दहा लहान मुलांचा समावेश आहे. गारपिटीचा तडाखा 370 गावांना बसल्याने यामध्ये 30 जनावरे दगावली आहे. परभणी जिल्ह्यातील 171, बीड 91, लातूर 71 आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 37 गावांना अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.

30 मिलिमीटरपर्यंत पाऊस
लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, देवणी सरासरी 7.13 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा वगळता सहा तालुक्‍यांत सरासरी नऊ मिलिमीटर पाऊस झाला. उमरगा तालुक्‍यात 27.80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, अंबाजोगाई, माजलगाव, केज, धारूर, परळी या तालुक्‍यात सरासरी 5.5 मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील 9 तालुक्‍यांत सरासरी 1.80 मिमी, परभणीत पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, परभणी या पाच तालुक्‍यांत 6.70 मिलिमीटर पाऊस झाला. सोनपेठ तालुक्‍यात सर्वाधिक 30 मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, वसमतमध्ये सरासरी 0.12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Web Title: 36 talukas un rain in Marathwada