पोस्टातील 4 लाखांची रक्कम झाली 84 रुपयांची!

पोस्टातील 4 लाखांची रक्कम झाली 84 रुपयांची!

हिमायतनगर : हिमायतनगर उपडाक कार्यालयातून खातेदाराच्या बचत खात्यातून परस्पर लाखो रुपयांची रक्कम उचलून अपहार केल्याची घटना जिल्हा डाक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या चौकशीतून पुढे आली आहे. जबाबदार असलेल्या तत्कालीन डाक अधिकारी व एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा कार्यालयातील अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी दिली. 

शहरातील उपपोस्ट कार्यालयातून तत्कालीन पोस्ट मास्तर शे. महेबूब व त्यांच्या सहकारी चव्हाण दोघांच्या हातून बचत खात्यातील रक्कम जमा करणे, उचल करण्याचे काम चालत होते. दरम्यान, दोघांनी संगनमत करून शहरातील बचत खातेधारक सध्या मयत आहेत. त्यांच्या हयातीत कै. विठ्ठल बाबा कोमावार यांच्या बचत खाते क्रमांक ५५७२५४१६९१ वरील ४ लाख ३१ हजार ३३ रुपयांपैकी ४ लाख ३० हजार ९५३ रुपयांची रक्कम परस्पर काढण्यात आली. 1 एप्रिल २०१८ रोजी केवळ ८४ रुपये शिल्लक राहिले असल्याचे बचत खाते विवरणावरून लक्षात आले. 

बचत खात्यावरील जमा रक्कम बनावट सहीने परस्पर उचलल्याची तक्रार खातेदाराचे नातू साईनाथ कोमावार यांनी नांदेडच्या मुख्य टपाल कार्यालयातील अधीक्षक शिवशंकर बी.लिंगायत यांच्याकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने २ जानेवारी बुधवारी शहरातील टपाल कार्यालयास लिंगायत, भोकरचे चौकशी अधिकारी पदमे इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली. तत्कालीन टपाल अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व अभिलेखे जप्त करून चौकशी कामी ताब्यात घेतले. तत्कालीन पोस्ट अधिकारी शेख, सहकारी चव्हाण दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यात आणखी 'मासे' गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदर प्रकारामुळे सुकन्या समृध्दी योजना, इंडिया पोस्ट पेमेंट, इंदिरा विकास पत्र, ठेवी, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, ग्रामीण टपाल खाते अशा विविध योजनेशी जोडल्या गेलेल्या ग्राहकांना भविष्याची चिंता लागली असून, यासह अन्य खात्यातील रकमेत हेराफेरी झाल्याचा शंका व्यक्त केला जात आहे. जवळपास साठ लाख व त्याहीपेक्षा अधिक रकमेची हेराफेरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, परस्पर उचललेली काही रक्कम संबंधितांनी खात्यात जमा केली असली तरी एकप्रकारे शासनाची फसवणूकच आहे.

याप्रकरणाची चौकशी सुरु : टपाल अधीक्षक

या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यामध्ये आणखी आठ - दहा दिवस लागतील. टपाल खात्यात एक रुपयापासून लाखो रुपयाचा गैरव्यवहार झाल्यास तत्काळ कारवाई केली जाते. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीअंती निश्चित कारवाई होईल. यात बारकावे तपासले जातील, प्रत्येक खातेदाराला विचारपूस करून रकमेची पडताळणी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. ग्राहकांनी टपाल खात्यावर विश्वास ठेवावा, असे टपाल अधीक्षक शिवशंकर बि. लिंगायत यांनी सांगितले.

टपाल कार्यालयात खातेदारांनी आपली रक्कम पाल्यांच्या भविष्याची विचार करून विश्वासाने जमा केली. त्यावरच जबाबदार अधिकाऱ्यांनी परस्पर बनावट सही करून बचत खात्यातील रकमेवर डल्ला मारला. जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळे केंद्र सरकारच्या टपाल कार्यालयावरील विश्वासास तडा गेला असून संबंधितांवर कडक कारवाई करावी.

- साईनाथ कोमावार, (तक्रारदार) रेल्वे उपभोक्ता समिती सदस्य हिमायतनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com