मराठवाड्यात वीज पडून चार ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा; सात जनावरे दगावली, पिकांचे नुकसान
औरंगाबाद - मराठवाड्यातील काही भागांना बुधवारी (ता. 15) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपीटही झाली. वीज पडून विद्यार्थ्यासह चारजण ठार झाले. सात जनावरे दगावली. पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांसह आंब्याचा मोहर, कैऱ्या; तसेच अन्य फळपिकांचे नुकसान झाले.

अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा; सात जनावरे दगावली, पिकांचे नुकसान
औरंगाबाद - मराठवाड्यातील काही भागांना बुधवारी (ता. 15) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपीटही झाली. वीज पडून विद्यार्थ्यासह चारजण ठार झाले. सात जनावरे दगावली. पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांसह आंब्याचा मोहर, कैऱ्या; तसेच अन्य फळपिकांचे नुकसान झाले.

मराठवाड्यातील बहुतांश भागांत गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलते आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर गार वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली होती. त्यामुळे रात्री थंडी जाणवत होती. धूलिवंदनापर्यंत हे चित्र होते. बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यांत आज सकाळपासूनच ऊन-सावलीचा खेळ सुरू झाला. या जिल्ह्यांच्या काही तालुक्‍यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीटही झाली. नांदेड जिल्ह्यात मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते.

वीज पडून तिघे ठार
बीड - शेतात गहू काढणी करीत असताना वीज कोसळल्यामुळे कवठळी (ता. परळी) येथे आश्रुबा किसन गायकवाड, सुशीला शिवलिंग कुंभार हे जागीच ठार झाले. शेतातून घरी जात असताना येवता (ता. केज) येथे ओमकर सटवा निर्मळ, नितीन आश्रुबा धिंगाने यांच्यावर वीज कोसळली. त्यात ओमकार निर्मळ हा विद्यार्थी जागीच ठार झाला, तर नितीन धिंगाने जखमी झाला असून, त्याला केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सातेफळ (ता. केज) येथे वीज पडून आश्रुबा भांगे यांच्या मालकीचे दोन बैल दगावले. दरम्यान, केज तालुक्‍यातील काही भागांत सकाळी दहाला वादळासह पाऊस झाला. दुपारनंतर परळी, अंबाजोगाई, पाटोदा तालुक्‍यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. गेवराई व धारूर तालुक्‍यांतही पाऊस झाला.

लातूर तालुक्‍यात तरुण ठार
लातूर - जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत गारपिटीसह अवकाळी पावसाने फटका बसला. वादळी वाऱ्यांमुळे काहींच्या घरांवरचे पत्रे उडाले. वीड पडून ढाकणी (ता. लातूर) येथील शुभम सुरवसे (वय 21) याचा मृत्यू झाला. बोरगाव काळे (ता. लातूर) येथे एक म्हैस, रामलिंग मुदगड (ता. निलंगा) येथे एक बैल दगावला.

उस्मानाबादेत तीन जनावरे दगावली
उस्मानाबाद - जिल्ह्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. मेंढा (ता. उस्मानाबाद) परिसरात पंधरा मिनिटे गारांचा पाऊस झाला. दुपारी एकच्या सुमारास पारगाव (ता. वाशी) भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारी दीडच्या सुमारास मेंढा परिसरात अर्धा तास अवकाळी पाऊस झाला, तर सुमारे पंधरा मिनिटे गारपीट झाली. कळंब शहरास तालुक्‍यातील मंगरूळ, देवधानोरा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कळंब तालुक्‍यातील वासवडा व बोराळा, तसेच कोंड (ता. उस्मानाबाद) येथे वीज कोसळून तीन जनावरे दगावली. देवधानोरा, मंगरूळ भागांत ज्वारी, गव्हाचे पीक आडवे झाले. ईट (ता. भूम), वाशी शहर व परिसरातही काही काळ पावसाने हजेरी लावली.

परभणी जिल्ह्यात गारपीट
परभणी - सोनपेठ शहरात दुपारी तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. त्यानंतर गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्‍यांतही अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. परभणी तालुक्‍यातील साळापुरी, ब्रह्मपुरी, दैठणा शिवारात मोठी गारपीट झाली. त्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले. पाथरी, मानवत आणि सेलू तालुक्‍याच्या काही भागांतही अशीच स्थिती होती.

- बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट
- बीड जिल्ह्यात विद्यार्थ्यासह तीन, तर लातूर जिल्ह्यात तरुण ठार
- गव्हासह अनेक पिकांचे नुकसान

Web Title: 4 person death in electroluction