त्या चार गावात शून्य मतदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

भिंगारा, चाळीस टापरी व गोमाल एक व गोमाल दोन अशा गावाचा समावेश आहे. आज (ता.18) मतदानाच्या दिवशीही बहिष्कार कायम असून, दुपारी 12 वाजेपर्यत एकही मतदान झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

बुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मुलभूत सुविधा नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागत आहे. यामध्ये भिंगारा, चाळीस टापरी व गोमाल एक व गोमाल दोन अशा गावाचा समावेश आहे. आज (ता.18) मतदानाच्या दिवशीही बहिष्कार कायम असून, दुपारी 12 वाजेपर्यत एकही मतदान झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, चाळीसटापरी, गोमाल एक व गोमाल दोन या गावातील नागरिकांनी सुविधांसह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. यावर प्रशासनाच्या वतीने गावकर्‍यांची समजूत काढण्यात येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती परंतु, मागण्यासंदर्भात वेळोवेळी केवळ आश्‍वासनच मिळत आल्यामुळे यंदा मागण्या मान्य झाल्याशिवाय बहिष्कार मागे न घेण्याची भूमिका गावकर्‍यांनी घेतली. गावकर्‍यांच्या वतीने तीन खुटी ते भिंगारा, भिंगारा ते चाळीस टापरी, चाळीस टापरी ते गोमाल डांबरीकरण रस्ता, गावात कायमस्वरुपी वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्यासाठी नळ, जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे, जळगाव जामोद उपविभागीय अधिकार्‍यांकडे तयार झालेले 48 लाभाथ्यांचे जमिन पट्टे त्वरित वितरित करण्यात यावे अशा प्रमुख मागण्या आहेत. 

गावात पुढारी बंदी
मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतरही सदर ग्रामस्थांच्या समस्या ऐकून व सोडविण्याच्या दिशेने कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे पाहून त्यांनी याविषयी आक्रमक पवित्रा घेत 13 एप्रिलपासून पुढार्‍यांना गावबंदी केली होती. या बंदीचा फलक गावाच्या प्रवेशव्दारावरच लावण्यात आला होता. 

Web Title: 4 villages have no voting in Buldana