अबब..! ४० टक्के बांधकामे अनधिकृत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

औरंगाबाद - शहरातील तब्बल ४० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यातील तीन हजार ५९ जणांची नावे समोर आली आहेत. खुद्द महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीच मंगळवारी (ता. ११) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली. 

औरंगाबाद - शहरातील तब्बल ४० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यातील तीन हजार ५९ जणांची नावे समोर आली आहेत. खुद्द महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीच मंगळवारी (ता. ११) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली. 

महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी गुंठेवारीचा विषय उपस्थित केला होता. जवाहर कॉलनीत काही जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. आपले बांधकाम नियमित करून घेण्यात यावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत नमूद आहे. यातील काहींनी गुंठेवारीचा हप्ता भरलेला आहे. त्यांच्या फायली निकाली न काढता अशा नोटिसा देऊन प्रशासन काय साध्य करणार आहे? मालमत्ताधारक पैसे भरण्यास तयार आहेत. त्यांच्याकडून पैसे न घेता दहशत निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप तुपे यांनी केला. राजू शिंदे, प्रमोद राठोड, मनीषा मुंडे, सीताराम सुरे, सुभाष शेजवळ, मनोज बल्लाळ, जहाँगीर खान यांच्यासह इतरांनी गुंठेवारीचे विषय उपस्थित केले. या भागात महापालिका सर्व सुविधा पुरविते मग त्यांच्याकडून कर घेण्यात यावा, अशी नगरसेवकांची मागणी होती. तुपे यांनी आयुक्त गप्प का, असे विचारले. त्यावर आयुक्त म्हणाले, की अतिक्रमणांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यामुळे नगररचना व अतिक्रमण विभाग एकत्र करण्यात आला आहे. तब्बल ३० ते ४० टक्‍के बांधकामे अनधिकृत आहेत. त्या-त्यावेळी कारवाया झाल्या नाहीत म्हणून, एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली. सध्या बेकायदा बांधकामांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तीन हजार ५९ जणांची यादी तयार असून, त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. 

गुंठेवारी निकाली काढणार
नव्या धोरणानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे नियमित केली जाणार आहेत. त्यामुळे गुंठेवारी अधिनियम कालबाह्य ठरला आहे. असे असले तरी वॉर्ड कार्यालयात शेकडो फायली प्रलंबित आहेत. त्या निकाली काढण्याचे आदेश महापौरांनी दिले.

Web Title: 40 percentage of the constructions are unauthorized in aurangabad