मुद्रा कर्ज घेणारे 41 जण आऊट ऑफ कव्हरेज   

मुद्रा कर्ज घेणारे 41 जण आऊट ऑफ कव्हरेज   

औरंगाबाद : केंद्र सरकारने स्वयंरोजगारासाठी राबविलेल्या मुद्रा कर्ज योजनेतही थकीत कर्जदार वाढत आहेत. बोगस कोटेशन देणऱ्यांबरोबर आता कर्ज घेऊन बॅंकेला गंडविणाऱ्यांची संख्याही शहरात वाढली आहे. बॅंक ऑफ बडोदाच्या एका शाखेतून मुद्रा कर्ज घेतलेले 41 लाभधारक गेल्या तीन महिन्यांपासून संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. 

बॅंक ऑफ बडोदाच्या बजरंग चौकातील शाखेत मुद्रा कर्ज योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत या शाखेतून एप्रिल ते डिसेंबर 2018 या कालावधीत 123 लाभार्थींना दोन कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. यापैकी 41 कर्जदारांचा संपर्क होत नाही. ज्या उद्देशाने कर्ज घेतले तो उद्योग उभारला नाही. यामुळे बॅंकेच्या कर्जवसुली अधिकाऱ्यांनी या कर्जदारांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला; मात्र दिलेले पत्तेही चुकीचे निघाले. यामुळे कर्ज घेतल्यापासून या लोकांचा संपर्क होत नसल्याचे बॅंकेतर्फे शेड्युल्ड बॅंकेला सांगण्यात आले. नियमाने कर्जवाटप करूनही कर्जदाराने बॅंकेची फसवणूक करीत 47 लाख रुपये यातून बुडविल्याचे उघड झाले आहे. या कर्जबुडव्यांची माहिती बॅंकेने लीड बॅंक असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रकडे दिली आहे. 

योजनेसाठी दलाल सक्रिय 

मुद्रा कर्ज योजनेसाठी कुठलेही तारण आणि जामीनदाराची गरज नाही. याचा फायदा घेत काहींनी बोगस कोटेशन तयार करून कर्ज मिळवले. 49 जणांनी बोगस कोटेशन दाखल करीत कर्जाची मागणी केली होती. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बॅंक व्यवस्थापकांवर कर्जमंजुरीसाठी दबाब आणत मुद्रा कर्ज योजना मंजूर केल्या. अशासकीय सदस्य चंद्रकांत हिवराळे, राजेश मेहता यांच्यासह काही नगरसेवक, विविध पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी दबाव आणत असल्याची तक्रारसुद्धा योजना राबविणाऱ्यांनी लीड बॅंक आणि बॅंक संघटनेकडे केली आहे. या योजनेसाठी सर्वत्र दलाल फिरत असून, कर्जासाठी बनावट कोटेशन बनवून कर्जदारास 10 टक्‍के देतात व उर्वरित 90 टक्‍के दलाल हडप करीत असल्याचा आरोपही महाराष्ट्र बॅंक एम्प्लॉईज फेडरेशनचे देविदास तुळजापूरकर यांनी केला होता. 

मुद्रा व इतर शासकीय योजनांच्या मंजुरीवरून बॅंकांच्या व्यवस्थापकांवर राजकीय पद्धतीने दबाव आणण्यात येत आहे. याविषयी मंगळवारी (ता. एक) सर्व बॅंकांनी बैठकीत तक्रार दिली आहे. यात सीसीटीव्ही, फोनचे रेकॉर्ड ठेवून पोलिसांकडे तक्रार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 
- प्रदीप कुतवळ, मुख्य प्रबंधक, लीड बॅंक 

आम्हाला अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी नेमणूक दिली. यामुळे मुद्रा कर्ज योजनेविषयी शिफारस करण्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही बॅंक व्यवस्थापकास सहकार्य करतो. खऱ्या लाभार्थींना कर्ज मिळावे, अशी आमची भूमिका असते. त्यानुसार आम्ही शिफारस करतो. आम्ही कोणावरही दबाव आणलेला नाही. 
- चंद्रकांत हिवराळे, अशासकीय सदस्य, मुद्रा लोन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com