लातुरात पाणी परिषदेकडे 50 नगरसेवकांची पाठ

हरी तुगावकर
Monday, 2 December 2019

लातूर शहरातील प्रत्येक नळाला मीटर बसवले तर त्याचा फायदा शहराला होऊन पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटण्यास मदत होणार आहे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या पुढाकारातून येथे दोन दिवसांची पाणी परिषद घेण्यात आली.

लातूर : लातूर शहरातील प्रत्येक नळाला मीटर बसवले तर त्याचा फायदा शहराला होऊन पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटण्यास मदत होणार आहे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या पुढाकारातून येथे दोन दिवसांची पाणी परिषद घेण्यात आली. खरेतर या कामात प्रत्येक प्रभागाचा नगरसेवक महत्त्वाची भूमिका वठवू शकतो. महापालिकेच्या 70 पैकी 50 नगरसेवकांनी या पाणी परिषदेकडे पाठ फिरवली.

सत्ताधारी कॉंग्रेस व आता विरोधी बाकावर बसणाऱ्या भारतीय जनता पक्षाचेही नगरसेवक या परिषदेकडे फिरकलेदेखील नाहीत. यातून पाण्याच्या बाबतीत नगरसेवक किती उदासीन आहेत, हे या पाणी परिषदेच्या निमित्ताने दिसून आले. 

दुष्काळ अनुभवूनही पाण्याबाबत उदासीनता
गेली अनेक वर्षे लातूर शहराला पाणीप्रश्न भेडसावत आहे. रेल्वेने पाणीपुरवठा केला गेल्याचा इतिहास जुना नाही. आठ-दहा दिवसांतून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. असे असतानासुद्धा पाणी वाया घालण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. यावर शहरातील प्रत्येक नळाला मीटर बसवणे हा एक मार्ग प्रशासनासमोर आहे. पण याबाबत जागृती झाली पाहिजे. याकरिता जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या पुढाकारातून शनिवारी आणि रविवारी हे दोन दिवस येथे पाणी परिषद आयोजित करण्यात आली होती. 

हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

काय आहे मातोश्री 2, कोठे आहे ही इमारत, जाणून घ्या

नगरपालिकांकडून आठ लाख रुपये गोळा
लातूर जिल्ह्यातील नगरपालिकांपेक्षा महापालिकेचा म्हणजेच लातूर शहराच्या पाण्याचा प्रश्न जटील आहे. असे असताना महापालिकेला आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून या परिषदेसाठी जिल्ह्यातील नगरपालिकांकडून सुमारे आठ लाख रुपये गोळा करण्यात आले. इतरांकडून काही पैसे गोळा करून ही परिषद घेण्यात आली. नागरिकांनी या परिषदेला यावे याकरिता मोफत सिटीबस सेवा देण्यात आली. त्याचा मोजक्‍याच नागरिकांनी लाभ घेतला.

खंडणी घेणार्या अभिनेत्रीला झाली अटक

समारोपाला तीनच नगरसेवक

या पाणी परिषदेत विविध नामांकित कंपन्यांना बोलवण्यात आले होते. त्यांच्या वॉटर मीटरचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. खरेतर या परिषदेला महापालिकेच्या नगरसेवकांनी उपस्थित राहणे आवश्‍यक होते. सर्व माहिती घेऊन महापालिकेच्या माध्यमातून कशी अंमलबजावणी करायची, याची चर्चाही त्यांना करता आली असती. महापालिकेपेक्षा नागरिकांच्या हिताचे काय आहे हे पाहता, ऐकता आले असते. पण तसे झाले नाही. महापालिकेच्या 70 पैकी 50 नगरसेवकांनी या परिषदेकडे पाठ फिरवली. समारोपाला तर तीनच नगरसेवक होते. सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक या परिषदेकडे फिरकले नाहीत. यातूनच पाणीप्रश्नाबाबत त्यांची उदासीनता दिसून आली. 

फ्लेक्‍स लावण्यात 
मानली धन्यता 

या पाणी परिषदेतून पाण्यासंदर्भात जनजागृती व्हावी, वॉटर मीटरचे महत्त्व लोकांना कळावे हा उद्देश होता. याकरिता पाणी परिषदेच्या स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजकातील खांबावर नगरसेवकांचे छायाचित्र असलेले फ्लेक्‍स लावण्यात आले होते. पाणी परिषदेकडे न येता फ्लेक्‍स लावण्यातच धन्यता मानण्यात आली. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 corporaters ignores water conference