५० कोटींचे रस्ते १७ कोटींनी महागले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - शासनाने दिलेल्या शंभर कोटींच्या रस्त्यांच्या निविदा अंतिम झाल्या असल्या तरी महापालिकेच्या निधीतून करण्यात येणाऱ्या ५० कोटींच्या निविदा रखडल्या आहेत. त्यात नवा डीएसआर रेट (जिल्हा दरसूची) लागू झाल्याने प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगलाच महागात पडला आहे. २१ रस्त्यांची ही कामे आता ६७ कोटींवर गेली आहेत. 

शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी दिला होता. बऱ्याच वादानंतर १०० कोटींमधून करण्यात येणाऱ्या रस्त्यांची निविदा नुकतीच अंतिम झाली. मात्र, डिफर्ड पेमेंटवर महापालिकेच्या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी ठेकेदाराकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या निविदा नव्याने व नव्या डीएसआर रेटने काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. २८)घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. नवीन डीएसआरमुळे आता १७ कोटींचा खर्च वाढला आहे. त्यामुळे ५० कोटींचे रस्ते ६७ कोटींवर गेले आहेत. 

निविदेला कार्योत्तर मंजुरी
बैठकीत महापौरांनी सांगितले, की अतिरिक्त निधी लागणार असला तरी त्यास सर्वसाधारण सभेत कार्योत्तर मंजुरी देण्यात येईल. निविदा प्रक्रिया थांबवू नका, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

३७ टक्‍क्‍यांनी महाग निविदा 
५० कोटींच्या दोन निविदा महापालिकेने काढल्या होत्या. त्यातील एक निविदा तब्बल ३७ टक्के जास्त दराने भरण्यात आली होती. महापालिका आयुक्तांनी तडजोड करून १७ टक्के जास्तीच्या दराने निविदा देण्याची तयारी दर्शविली होती; मात्र कंत्राटदार तयार नसल्याने नव्याने निविदा काढण्याचा निर्णय झाला. त्यात आता १७ कोटींची वाढ झाली आहे.

Web Title: 50 crores roads cost Rs 17 crores