पाचशे, दोन हजारच्या नोटा बॅंकांतून होताहेत गायब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

औरंगाबाद - काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी मोठ्या चलनी नोटा रिझर्व्ह बॅंकेने चलनातून बाद केल्या; मात्र त्याऐवजी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या. दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे लाखो रुपये सांभाळणे सोपे झाले. त्यामुळे काळा पैसा पांढरा करून दोन हजार रुपयांच्या नोटा दडवून ठेवल्या. परिणामत: बॅंकांतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब होत आहेत.

औरंगाबाद - काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी मोठ्या चलनी नोटा रिझर्व्ह बॅंकेने चलनातून बाद केल्या; मात्र त्याऐवजी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या. दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे लाखो रुपये सांभाळणे सोपे झाले. त्यामुळे काळा पैसा पांढरा करून दोन हजार रुपयांच्या नोटा दडवून ठेवल्या. परिणामत: बॅंकांतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब होत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर सहा महिन्यांच्या कालावधीत नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या तब्बल सहाशे कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅंकेकडून औरंगाबादेत आल्या. त्यानंतर दैनंदिन व्यवहारासह जुन्या चलनी नोटांऐवजी बदलून देण्यासाठी या नोटांचा वापर झाला. यादरम्यान 12 मार्चपासून एटीएम आणि बॅंकेतून खातेधारकांनी काढावयाच्या पैशावरील मर्यादा उठविण्यात आली. मर्यादा उठविल्यामुळे खातेधारकांनी रोख पैसे मोठ्या प्रमाणात काढण्यास सुरवात केली. त्यामुळे बॅंकांच्या तिजोऱ्या पटापट रिकाम्या होऊ लागल्या. त्या तुलनेत रिझर्व्ह बॅंकेकडून करन्सी चेस्टला पैशांचा पुरवठा कमी झाला.

दरम्यान, काळा पैसा नव्या नोटांच्या माध्यमातून पांढरा केला. तोच पैसा पुन्हा काळा होऊ लागला आहे. त्याशिवाय बॅंकेत पैसे मिळत नसल्याने खातेधारक गरजेपेक्षा अधिक पैसे अगोदरच काढून ठेवताहेत. दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे अधिक पैसा बाळगणे अधिक सोपेही झाले. त्याशिवाय बॅंकांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध सेवाकरांमुळेही खातेधारक एकाच वेळी मोठी रक्‍कम काढून घेताहेत. परिणामत: बॅंकेत नव्या नोटांचे प्रमाण कमी होत आहे.

साडेसातपैकी एक कोटी नव्या नोटा
नाव न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या अकाउंटंटने सांगितले, की मे महिन्याच्या सुरवातीला साडेसात कोटी रुपयांची रक्‍कम बॅंकेत जमा झाली होती. वास्तविक किमान निम्म्या नोटा दोन हजार रुपयांच्या हव्या होत्या; मात्र यामध्ये दहा, वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटांचे प्रमाण अधिक होते. दुसरीकडे पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या केवळ एक कोटी रुपयांच्या नोटा होत्या. दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा पुन्हा काळा पैसाधारकांकडे जात असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्‍त केला.

निम्म्याहून अधिक एटीएम बंद
रिझर्व्ह बॅंकेकडून होणारा कमी चलन पुरवठा व बॅंकेत खातेधारकांकडून जमा होणाऱ्या कमी पैशांमुळे बॅंकांच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत. त्यामुळे मागील एक महिन्यापासून निम्म्याहून अधिक एटीएम बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे एटीएमची अवस्था असतील तर मिळतील अशी झालेली आहे.

Web Title: 500, 2000 currency missing in bank