महिला कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर ५० हजार लंपास 

3c
3c

पाथरी ः शहरातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेच्या बँक खात्यातील ५० हजार रुपये औरंगाबाद येथील दोन एटीएममधून परस्पर काढत आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने शनिवारी (ता.२६) पाथरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. 

पाथरीतील माळीवाडा येथे राहणाऱ्या व सध्या जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे कार्यरत असलेल्या जयश्री सुभाष नाईक असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. जयश्री नाईक यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली येथील स्वतःच्या खात्यातील नऊ हजार पाचशे रुपये पाथरीतील सेलु कॉर्नर परिसरात असणाऱ्या एटीएममधून दहा डिसेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास काढले होते. 

येथून काढले पैसे 
यानंतर (ता.१२) रोजी औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात असणाऱ्या एटीएममधून अज्ञात व्यक्तीने सकाळी सव्वासात ते साडेसातच्या दरम्यान तीन वेळा प्रत्येकी दहा हजार रुपयांची रक्कम काढली. यानंतर १३ डिसेंबर रोजी परत औरंगाबाद येथील जवाहर कॉलनी परिसरात असलेल्या एटीएममधून सकाळी सव्वा आठ ते साडे आठच्या दरम्यान २० हजार रुपये काढले. यासंदर्भात सदरील महिलेला मोबाईलवर एसएमएस आल्यानंतर माहिती कळाली. तोपर्यंत अज्ञात व्यक्तीने या महिलेच्या खात्यातून सुमारे ५० हजार लंपास केले होते. विशेष म्हणजे या महिलेचे एटीएम कार्ड या दरम्यान तिच्या जवळच होते व कोणीही कॉल करत ओटीपी संदर्भात विचारणा केलेली नव्हती. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदरील महिलेने यासंदर्भात हिंगोली येथील बँक प्रशासनाकडे पैसे कपात झाल्याबद्दल विचारणा करत लेखी तक्रारही दिली होती. दरम्यान या खात्याचे एटीएम ब्लॉक करण्यात आले होते. यानंतरही २२ डिसेंबर रोजी तीनच्या सुमारास पुन्हा अज्ञात व्यक्तीने खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचा मेसेज आल्यानंतर सदरील महिलेने यासंदर्भात पाथरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू 
गंगाखेड ः तालुक्यातील सुनेगाव सायाळा येथील युवक आत्माराम बालासाहेब फिस्के हे रूमणा येथून सुनेगावकडे पायी चालत येत असताना (ता.२६) रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यातील सुनेगाव सायाळा येथील युवक आत्माराम बाळासाहेब फिस्के (वय ३८) हे रूमणा येथून सुनेगाव सायाळा या आपल्या गावी पायी येत असताना सुनेगाव पाटीजवळ परसराम सूर्यवंशी यांचे शेतातील हौदाजवळ परभणी ते गंगाखेड रोडवर अज्ञात वाहन चालकाने वाहन निष्काळजीपणाने चालवत जोराची धडक दिली. यामध्ये आत्माराम फिस्के यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळासाहेब रामभाऊ फिस्के यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध (ता.२७) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश राठोड, पोलिस कर्मचारी ओम वाघ, जमादार दत्ता पडोळे हे करत आहे. 

गंगाखेड येथे घरफोडी 
गंगाखेड : गंगाखेड शहरामध्ये चोरीसत्र सुरूच असून यापूर्वी घडलेल्या चोरीचा अद्याप सुगावा लावलेला नसतानाच शहरातील देवळे जिनिंग परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत नगदी दीड लाखासह सोन्या-चांदीच्या ऐवज लंपास केल्याची घटना घडली. शहरातील देवळे जिनींग परिसरातील रहिवासी नितीन वसंतराव तेललवार हे (ता.२६) डिसेंबर रोजी कुटुंबासह पालम येथुन गंगाखेड येथे आले. रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान देवळे जिनिंग परिसरात असलेल्या घरी गेले. त्या ठिकाणी चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटामध्ये असलेल्या सोन्याच्या सहा ग्रॅमच्या दोन अंगठ्या, पाच ग्रॅमचे एक लॉकेट, ६८ तोळे वडिलोपार्जित चांदी, ज्याची एकूण किंमत एक लाख ४३ हजार रुपयांचे दागिने चोरी गेल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी घरातील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. यासंदर्भात नितीन तेललवार यांनी गंगाखेड पोलिस स्टेशन येथे माहिती दिल्यानंतर परभणी येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. विकास तेललवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गंगाखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. 

भरधाव वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू 
जिंतूर ः रस्ता ओलांडताना भरधाव चारचाकी वाहनाची जोराची धडक लागल्याने एका काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२७) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास जिंतूर-येलदरी मार्गावर केहाळ फाट्याजवळ घडली. यावेळी पत्रकार शेख अलीम हे येलदरीकडे जात असतांना अपघातग्रस्त काळवीट गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेले दिसले असता त्यांनी त्या मुक्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्याच्या डोक्यावर व तोंडाला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत शेख अलीम यांनी स्थानिक वनमजूर (नाव समजले नाही.) पक्षीमित्र अनिल उरटवाड व विजय ढाकणे यांना माहिती दिली असता ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत काळवीटास वनमजूराच्या ताब्यात दिले. जिंतूर तालुक्यात हरिण, काळवीट, रानडुकरे व इतर वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. सध्या हिरवा चारा खाण्यासाठी शेतातील पिके फस्त करत असल्याने त्यांचा हमरस्त्यावर संचार वाढला आहे. त्यातच हे काळवीट रस्ता ओलांडतेवेळी रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाची त्यास जोराची धडक बसल्याने त्याचा म्रुत्यु झाला.  

नूतन कॉटन जिनींगला शॉर्टसर्किटने आग लागून नुकसान 
सेलू ः येथील नूतन कॉटन जिनींगला शॉर्टसर्किटमुळे आग लागून पंधरा लाखाचे नुकसान झाल्याची घटना रविवारी (ता.२७) रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली. सेलू येथील पाथरी रस्त्यावरिल नूतन कॉटन इंडस्ट्रीज येथे दर रविवारी खराब रुई मशीनमधून काढून साफसफाई करण्यात येते. त्याप्रमाणे रविवारी साफसफाई करत असताना अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्यानंतर लगेच पाच मिनिटाच्या आत पुन्हा विद्यूत पुरवठा सुरळीत झाला. जसा विद्युत पुरवठा सुरू झाला. तसे जिनींगमध्ये शॉर्टसर्किट होऊन एकदम भडाका उडाला. त्यामुळे मोठमोठे आवाज होऊन जिनींगमध्ये आग लागली. स्थानिक मजुरानी लगेच आग विझावण्याचा आटोकट प्रयत्न केला. परंतू, आग आटोक्यात येत नव्हती. या आगीत जवळपास पंधरा लाखाचे नुकसान झाल्याची माहिती जिनींगचे संचालक तथा जिल्हा परिषदचे सदस्य राम (नाना) पाटील यांनी या वेळी बोलताना दिली. 


संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com