esakal | मराठवाड्यातील रस्ते, पुल दुरुस्तीसाठी ५५० कोटींचा निधी ; अशोक चव्हाण 
sakal

बोलून बातमी शोधा

ashok chavan

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे शुक्रवारी (ता.३०) परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत विविध योजनेच, कामांसाठी मंजूर झालेल्या निधीची माहिती दिली.  

मराठवाड्यातील रस्ते, पुल दुरुस्तीसाठी ५५० कोटींचा निधी ; अशोक चव्हाण 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः  अतिवृष्टीत क्षतीग्रस्त झालेल्या रस्त्यांसह पुलांच्या कामाकरिता दोन हजार ६३५ कोटी रुपये मंजुर केले आहेत. त्यापैकी ५५० कोटी रुपये मराठवाड्यातील रस्ते व पुलांच्या दुरूस्तीकरिता उपलब्ध होणार आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.३०) परभणीत पत्रकारांना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टीने ग्रस्तक्षेत्रास राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातुन बांधकाम खात्यातील क्षतीग्रस्त रस्त्यांसह पुलांच्या कामाकरिता दोन हजार ६३५ कोटी रुपये मंजुर केले आहेत. त्यापैकी ५५० कोटी रुपये मराठवाड्यातील रस्ते व पुलांच्या दुरूस्तीकरिता उपलब्ध होणार आहेत. त्यातील ५६ कोटी रुपये परभणी जिल्ह्यातील क्षतीग्रस्त भागांच्या कामांकरिता खर्च केले जातील असे त्यांनी सांगितले. या दोन तीन महिन्यात या कामांना मंजुरी, पाठोपाठ निविदांची प्रक्रियासुध्दा सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलिस अधीक्षक जयंत मीना, सुरेश नागरे यांच्यासह बांधकाम खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे तातडीने पूर्ण करावीत 
परभणी ः जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पूल व रस्ते हे खचलेले असून या कामासाठी तत्काळ ५६ कोटी रुपयांना मंजुरी देत आहे. आता पाऊस पूर्णपणे थांबलेला असून सर्व कामांना गती देऊन रस्ता वाहतुकीसाठी चांगला व्हावा. याअनुषंगाने जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या प्रसंगी ते बोलत होते. बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलिस अधीक्षक जयंत मीना आदींची उपस्थिती होती. 

हेही वाचा - हिंगोली : किन्होळा येथे चोरून वीज वापरण्यास मज्जाव केल्यामुळे महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण

निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करा 
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, अतिवृष्टीने रस्त्याचे व पुलाचे नुकसान झालेले आहे. त्याच्या कामाकरिता ५६ कोटी रुपयांना मंजुरी देत असून निविदा प्रक्रिया राबवायला सुरुवात करा. तसेच कामांना गती द्या, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना देऊन वर्षभरापूर्वीच काम पूर्ण झालेल्या रस्त्यावर खड्डे पडण्याचे निदर्शनास येत असून निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून अहवाल पाठवावा. तसेच संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी संबंधित अधीक्षक अभियंता श्री.धोंडगे यांना दिले. बैठकीच्या सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परभणी जिल्ह्यातील मंजूर कामे, लहान-मोठे पुलांची बांधकाम स्थिती, खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्यासाठी आवश्यक खर्च, रस्ते विकासासाठी आवश्यक निधी, नाबार्ड अंतर्गत पूर्ण झालेली कामे, इमारत दुरुस्तीची कामे, कोविड-अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली विविध कामे याबाबतची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

हेही वाचा - नांदेडच्या प्रा. यशपाल भिंगेंना विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ऑफर

पोलिस मुख्यालयातील ५६३ निवासस्थाने बांधण्याबाबत निर्देश 
परभणी पोलिस वसाहतीमधील ५६३ निवासस्थाने बांधण्यासह इतर मुद्यावर तातडीने कारवाई करावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास शुक्रवारी (ता.३०) दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे शुक्रवारी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बांधकामाचा आढावा घेतला. बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पोलिसांच्या ५६३ निवासस्थाने बांधणे, विश्रामगृहाची उभारणी, बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी प्रशासकीय इमारत, पोलिस वसाहतीसाठी तटभींत बांधणे, वसाहतीसाठी नवीन पाईप लाईन अंथरणे, अतंर्गत रस्त्याचे डांबरीकरण व कॉक्रीटीकरण करणे, बंदोबस्तासाठी येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्त हॉलचे बांधकाम करणे, परेड मैदानाचे लेवलिंग करून चारशे मीटरचा ट्रॅक तयार करणे, ड्रेनेज लाईन व सेप्टीक टॅंकची उंची वाढविणे, परेड मैदानावर चारही बाजूने गॅलरी करणे, मंचाचे सुशोभिकरण करणे मैदानावर तटबंदी भिंत उभारणे आदी कामासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.  

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image