उमरगा : ६२ वर्षीय महिलेचा कोवीड रुग्णालयात मृत्यू

अविनाश काळे
रविवार, 12 जुलै 2020

विषाणूचा संसर्ग त्यात मधूमेह, रक्तदाब, मानसिक तणाव ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद)  : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात रविवारी (ता. १२) दुपारी तुरोरी (ता. उमरगा)  येथील एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यापूर्वी चार ज्येष्ठांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

विषाणूचा संसर्ग त्यात मधूमेह, रक्तदाब, मानसिक तणाव ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. रविवारी दुपारी एकच्या दरम्यान तुरोरी येथील ६२ वर्षीय महिला अति गंभीर स्थितीत कोविड रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार त्या महिलेचा प्रथम स्वॅब घेण्यात आला. त्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, जववळपास एक तासानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती चाचणीच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल.

परभणी जिल्ह्यात तीन दिवसांची तर गंगाखेडला १९ जूलैपर्यंत संचारबंदी...

सध्या महिला कोरोना संशयित असल्याने रुग्णालय प्रशासनाने कोविड पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याविषयीचे पत्र नगरपालिकेला दिले आहे. सोमवारी (ता.१३) सकाळी त्या महिलेवर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत पालिका व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान शनिवारी (ता. ११) पाठविलेल्या २७ स्वॅबचा अहवाल रविवारी उशिरा येण्याची शक्यता नाही असे सूत्राने सांगितले तर रविवारी ३८ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहे.
 
गुंजोटीत ७० वर्षीय ज्येष्‍ठाची कोरोनावर मात 
गुंजोटी : येथे बाहेरपेठ भागातील एका तरुणासह त्याच्या ७० वर्षीय वडिलांना कोरोनाची बाधा झाली होती. संबंधित ज्येष्ठ अर्धांगवायूने ग्रस्त आहे. दरम्यान, योग्य उपचाराने हा ज्येष्ठ आणि त्याचा मुलगा कोरोनातून बरे झाले. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांची रुग्णालयातून सुटी केली. कोरोनाबाधित वृद्धाचा मुलगा पुण्यावरून गुंजोटीला आला होता. त्यानंतर त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शनिवारी (ता. ११) त्याच्यासह त्याच्या वडिलांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. 
 
उस्मानाबाद कोरोना मीटर 

  • एकूण बाधित - ३७८ 
  • एकूण बरे झालेले -२३७ 
  • एकूण मृत्यू - १७ 
  • उपचार सुरू असलेले - १२४ 
  • आजचे पॉझिटिव्ह - २४ 
  • आज मृत्यूची नोंद - ०३ 

(संपादन : विकास देशमुख)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 62-year-old Woman Dies in Umarga District Osmanabad