जायकवाडी धरणात 68 टक्के पाणीसाठा

चंद्रकांत तारु
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गोदावरीला आलेल्या महापुराचे पाणी जायकवाडीत दाखल झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली.

पैठण (जि.औरंगाबाद) : जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (ता. आठ) 31 हजार क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. धरणाचा एकूण पाणीसाठा 68 टक्के झाला आहे, अशी माहिती धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी दिली.

आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गोदावरीला आलेल्या महापुराचे पाणी जायकवाडीत दाखल झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली. धरण मृतसाठ्यातून बाहेर येऊन निम्म्यापेक्षाही अधिक भरले. यानंतर आज दिवसभरात पाणी येण्याचे प्रमाण कमी होते. गुरुवारी रात्रीपर्यंत 68 टक्के पाणीसाठा झाला असून, सत्तर टक्‍क्‍यांकडे पाणीसाठा जात असल्याची माहिती धरण नियंत्रण कक्षातील सूत्रांनी दिली. धरणाची पाणी पातळी 1515.48 फूट, 461.916 मीटर आहे. पाण्याची आवक 31038 क्‍युसेक, एकूण पाणी साठा 2196.261 दशलक्ष घनमीटर आहे. जिवंत पाणीसाठा 1458.155 दशलक्ष घनमीटर आहे.

पैठण शहर, परिसरात यंदा प्रथमच चांगला पाऊस

तीन दिवसांपासून पैठण शहरात पाऊस होत आहे. जून, जुलै या पावसाळ्यातील सुरवातीच्या दोन महिन्यांत एकदाही चांगला पाऊस झाला नाही. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस होत असल्यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. हा पाऊस ग्रामीण भागातही होत असल्याचे नानेगाव (ता. पैठण) येथील शेतकरी प्रमोद बोधणे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 68 percent water storage in jayakwadi