गंगाखेडच्या दसरा महोत्सवाची सातशे वर्षाची परंपरा होणार खंडित

प्रा.डॉ. अंकुश वाघमारे | Tuesday, 13 October 2020

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील बालाजी मंदिर हे तिरुपती बालाजीनंतर महत्त्वाचे मंदिर मानले जाते. तिरुपती येथे होणाऱ्या दसरा महोत्सवाच्या धर्तीवरच गंगाखेड येथील दसरा महोत्सवाला सातशे वर्षांची परंपरा आहे. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील दसरा महोत्सवाची सातशे वर्षांची परंपरा खंडित होणार असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सुर बघायला मिळत आहे.  

गंगाखेड (परभणी) : तिरुपती बालाजीनंतर महत्त्वाचे बालाजी मंदिर हे गंगाखेड येथील आहे. तिरुपती येथे होणाऱ्या दसरा महोत्सवाच्या धर्तीवरच गंगाखेड येथे दसरा महोत्सवाचे मागील सातशे वर्षापासून आयोजन केले जाते. परंतू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडणार, असा निर्णय घेतल्यानंतर गंगाखेड येथील दसरा महोत्सवाची सातशे वर्षांची परंपरा खंडित होत असल्याने भाविकांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. 

गंगाखेड येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाला सातशे वर्षांचा इतिहास आहे. परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील भक्तगण रथ महोत्सव पाहण्यासाठी अलोट गर्दी करतात. दसरा महोत्सवाच्या नऊ दिवसांच्या काळात बालाजीच्या मूर्तीची विविध वाहनातून शहरातील शनी मंदिर, डॉ. आंबेडकर नगर, दिलकश चौक, मोठा मारुती, जनाबाई मंदिर आदी भागातून मिरवणूक काढली जाते. शहरातील विविध भागात प्रसाद आणि अन्य साहित्य विक्रीची दुकाने थाटली जातात. एकप्रकारे नऊ दिवस गंगाखेड शहराला यात्रेचे स्वरूप येते. येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून आणि परराज्यातून भाविक दर्शनाला येतात. 

विजयादशमीच्या दिवशी असतो रथोत्सव

प्रत्येक वर्षी विजयादशमीच्या दिवशी रथोत्सवाचे आयोजन केले जाते. शहरातील याच मार्गावरून रथाची मिरवणूक काढली जाते. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी मराठवाड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात गंगाखेड येथे दाखल होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांमध्ये (ता.१७) ऑक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या दसरा महोत्सव संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. परंतू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडणार असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा हा ऐतिहासिक दसरा महोत्सवाची परंपरा खंडित होणार आहे.  

विधिवत पूजा मंदिरामध्ये केली जाणार
 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे मोठ्या स्वरूपात होणारा दसरा महोत्सव यावर्षी होणार नाही. असे असले तरी देवाची विधिवत पूजा मंदिरामध्ये केली जाणार आहे. नागरिकांसाठी मात्र मंदिर शासनाच्या नियमाप्रमाणे बंदच असेल.

- चंद्रकांत खारकर, पुजारी तथा विश्वस्थ बालाजी संस्थान, गंगाखेड.

संपादन - सुस्मिता वडतिले 

मोर्चा, निदर्शनाने दणाणला परभणी जिल्हा 
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या भारत बंदमध्ये विविध संघटना, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयासह खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत बंद यशस्वी केला. यात सेलूत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. परभणीत भाकपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. परभणी शहरात कामगारांच्या आंदोलनात बीएसएनएलमधील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच गंगाखेड येथे हमाल मापाडी मजदूर युनियन शाखा गंगाखेडच्या वतीने तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे किर्तीकुमार बुरांडे व इतर सहभागी झाले होते. तर परभणी जिल्हा कोषागार कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी संघटेनेचे मंगेश जोशी व इतरांनी निदर्शने केली.  
परभणी : सत्तांतराची मुहूर्तमेढ रोवणारी ही निवडणुक ठरणार- पंकजा मुंढे यांचा परभणीत दावा
औद्योगिक परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालायात पदविधरांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी (ता.26) घेण्यात आला. व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, किशोर कोंडगे, प्रवीण घुगे, इद्रीस मुलतानी, माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर, मोहन कुलकर्णी, रामप्रभू मुंडे, विठ्ठलराव रबदडे, अ‍ॅड. व्यंकटराव तांदळे, रामकिशन रौंदळे, अजय गव्हाणे, बाळासाहेब भालेराव, संजय रिझवाणी, मधुकर गव्हाणे, राजेश देशपांडे, एन.डी. देशमुख, डॉ. राजेंद्र चौधरी, समीर दुधगावकर आदीउपस्थित होते.