वीज पडून मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील दुर्घटना, पाच गंभीर

नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील दुर्घटना, पाच गंभीर
औरंगाबाद/नांदेड - मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत आज दुपारनंतर विजांच्या कडकडासह पाऊस झाला. वीज पडून आठ जण मृत्युमुखी पडले, तर पाच गंभीर जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांत बहीण-भावासह दोन महिला मजुरांचा समावेश आहे. वीज पडल्याच्या घटनांत काही जनावरेही दगावली आहेत.

नांदेड - शाळा सुटल्यानंतर शेतात गेलेल्या भाऊ-बहिणीवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास किनवट तालुक्‍यातील मलकापूर (खेर्डा) शिवारात घडली. हेमंत लवसिंग जाधव (10), शालिनी लवसिंग जाधव (8) अशी मृत्यू पावलेल्या मुलांची नावे आहेत. मुखेडपासून जवळ असलेल्या चुडाजीची वाडी येथे गोठ्यावर वीज पडून विक्रम उद्धव मुंडकर (27) याचा जागीच मृत्यू झाला. त्याची काकू इंदुबाई गोविंद मुंडकर (50) गंभीर जखमी झाली. वीज पडून केदारकुंठा (ता. देगलूर) येथील शेतकरी मारुती केशवराव बाऱ्हाळे (60) यांचा मृत्यू झाला.

लातूरमध्ये दोन दुर्घटना
लातूर - शहरासह जिल्ह्यातील औसा, जळकोट, देवणी भागांत विजांच्या गडगडाटासह दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. मरसांगवी (ता. जळकोट) येथे शेतात काम करत असलेल्या वासीम हसन भांडे (वय 15), तर कन्हेरी (ता. औसा) येथील सुभाष लिंबाजी चव्हाण (वय 60) यांचा वीज पडून मृत्यू झाला.

दोन महिला मजुरांचा मृत्यू
उस्मानाबाद - वाणेवाडी (ता. उस्मानाबाद) येथे दुपारी ढगाळ वातावण निर्माण होऊन पावसाला सुरवात झाली. या वेळी वीज कोसळल्याने शीतल तुळशीराम घुटूकडे (32), शालूबाई बबन पवार (50) या जागीच ठार झाल्या. कौशल्या शेषेराव सरवदे (45), श्‍यामल लहू सरवदे (40), छाया भास्कर सरवदे (50) या जखमी झाल्या.

Web Title: 8 death by lightning