पाइपलाइनसाठी ८० लाखांचा बोगस प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - प्लॉटिंग मालकाला फायदा व्हावा यासाठी पैठण रोडवर १६० मीटर लांबीची पाइपलाइन जमिनीखाली दाबण्याचा सुमारे ८० लाख रुपयांचा बोगस प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आल्याचा आरोप सोमवारी (ता. सहा) सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला. त्यावर आठ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहेत.

औरंगाबाद - प्लॉटिंग मालकाला फायदा व्हावा यासाठी पैठण रोडवर १६० मीटर लांबीची पाइपलाइन जमिनीखाली दाबण्याचा सुमारे ८० लाख रुपयांचा बोगस प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आल्याचा आरोप सोमवारी (ता. सहा) सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला. त्यावर आठ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहेत.

पैठण रोडवर हॉटेल आनंद रेस्टॉरंटसमोरील १२१९ मिलिमीटर व्यासाच्या मुख्य पाइपलाइनचे काम करण्याचा हा प्रस्ताव आहे. त्यात म्हटले आहे, की पैठण राज्य रस्ता क्रमांक तीसच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार आहे. त्यामुळे ही पाइपलाइन बाधित होत आहे. १६० मीटर लांबीची पाइपलाइन जमिनीत दाबण्यासाठी सुमारे ७९ लाख ९३ हजार ३२२ रुपयांचा हा प्रस्ताव होता. त्यावर राजू शिंदे यांनी आक्षेप घेतला. किती ठिकाणी अशाप्रकारे पाइपलाइन बदलावी लागणार आहे, याचा खुलासा घेण्याची मागणी त्यांनी केली. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे समाधान झाले नाही. नऊ ठिकाणी अशाप्रकारची कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी ९ कोटी रुपये महापालिका कुठून आणणार? असा प्रश्‍न त्यांनी केला. हा ठराव बोगस असून, या ठिकाणी सुरू असलेल्या प्लॉटिंगला फायदा होणार आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी चौकशीची मागणी केली. सीताराम सुरे यांनी पैठण रोडच्या पर्यायी मार्गाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा विचार केला जाऊ नये, असे नमूद केले. महापौरांनी प्रस्तावाबाबत नाराजी व्यक्त करीत ज्या ताटात आपण खातो, त्यात घाण करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी आठ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. 

पाईप आले कुठून? 
या कामाच्या वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यापूर्वीच त्या ठिकाणी पाइप टाकण्यात आले आहेत. हे पाईप आले कुठून, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. ‘पाईप खात्यामार्फत पुरवठा केल्यास...’ असे गोलमाल शब्द प्रस्तावात वापरण्यात आले आहेत. 

Web Title: 80 lakh bogus proposal for pipeline