साडेदहा महिन्यांत 84 शेतकरी आत्महत्या 

उमेश वाघमारे 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

जालना जिल्ह्यात अस्मानी संकटासोबत डोक्‍यावर कर्जाचा डोंगर 

जालना -  जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर कमी होण्यास तयार नाही. या कर्जाच्या डोंगराखाली दबून मरणयातना असह्य झाल्याने शेतकरी मरणाला कंवटाळत आहे. या वर्षात जानेवारी ते ता. 12 नोंव्हेबरपर्यंत जिल्ह्यात तब्बल 84 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

गतवर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात भयावह दुष्काळाचे सावट आले होते. दुष्काळामुळे झालेली नापिकी हे शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर वाढविणारी ठरली. तर दुसरीकडे यंदाही सुरवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पेरणीला उशिरा सुरवात झाल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेला खरिपाचा घात परतीच्या पावसाच्या पाण्यात सडून गेला. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पुन्हा घट निश्‍चित झाली. 

या अस्मानी संकटांना कंटाळून जानेवारी ते ता. 12 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 84 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारकडून मिळणारी तोकडी मदत आणि डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर जात असल्याचे चित्र आहे. 

चार प्रकरणे अपात्र, एक चौकशीअंती प्रलंबित 
जानेवारी ते ऑक्‍टोबरदरम्यान 80 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी चार प्रकरणे शेतकरी आत्महत्या आर्थिक मदतीस अपात्र ठरले आहेत. तर एक प्रकरण चौकशीकरिता प्रलंबित आहे. तर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या चार शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे या महिनाअखेरीस निर्णय होईल. 

नोव्हेंबरमध्ये चौघांनी संपविले जीवन 
परतीच्या पावसानंतर शेतीला मोठा फटका बसला, पिके होत्याची नव्हती झाली. त्यातच ता. एक नोव्हेंबर ते ता. 12 नोव्हेंबर यादरम्यान जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात मंठा तालुक्‍यातील तीन, तर भोकरदन तालुक्‍यातील एक शेतकरी आहे. 

75 लाखांचा आर्थिक मदत 
जानेवारी ते ऑक्‍टोबरदरम्यान झालेल्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी 75 शेतकरी आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. या 75 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाने 75 लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. 

मागच्या वर्षीचा कोरडा दुष्काळ व यंदाच्या ओला दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. यंदा बॅंकांमार्फत; तसेच खासगी सावकारांकडून कर्ज काढून मोठ्या अपेक्षेने पेरणी केली होती; मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने जीवन जगणेच आता कठीण झाले आहे. 
रामराव गाढे, 
शेतकरी, सोमनाथ 
--------------- 
सरकारचे उदासीन धोरण, दरवर्षी पावसाचे कमी होणारे प्रमाण, मालाला योग्य भाव नसणे यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. त्यातच यंदा मोठ्या मेहनतीने हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही. सततच्या नापिकीमुळे हतबल होऊन शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. 
- संगीताबाई भुतेकर, 
महिला शेतकरी, हिवर्डी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 84 Farmer suicide in ten month