स्मार्ट सिटीसाठी आला 92 कोटींचा निधी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

औरंगाबाद - स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 92 कोटी रुपयांचा निधीचा पहिला हप्ता देण्यासंदर्भात कोषागार कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. शनिवारी (ता. चार) हा निधी एसपीव्हीच्या (विशेष हेतू यंत्रणा) खात्यात वर्ग होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. तीन) मुंबईत स्मार्ट सिटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अपूर्व चंद्रा यांच्यासमोर जनरल कन्सलटन्सी म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तीन संस्थांनी सादरीकरण केले.

औरंगाबाद - स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 92 कोटी रुपयांचा निधीचा पहिला हप्ता देण्यासंदर्भात कोषागार कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. शनिवारी (ता. चार) हा निधी एसपीव्हीच्या (विशेष हेतू यंत्रणा) खात्यात वर्ग होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. तीन) मुंबईत स्मार्ट सिटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अपूर्व चंद्रा यांच्यासमोर जनरल कन्सलटन्सी म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तीन संस्थांनी सादरीकरण केले. स्मार्ट सिटीचा नागरिकांना काय फायदा होणार आहे, हे केंद्रस्थानी ठेवून आराखडा व विकासविषयक मास्टर प्लान तयार करून पुन्हा एकदा सादरीकरण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

स्मार्ट सिटीसाठी एसपीव्ही स्थापनेनंतर एक बैठक झाली. मात्र, या बैठकीस स्मार्ट सिटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अपूर्व चंद्रा उपस्थित नव्हते. यानंतर दुसरी बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार होती. पण, त्यांनी जनरल कन्सलटन्सीसाठी इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी आणि महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांना मुंबईमध्ये बोलावले होते. आयुक्‍तांसह स्मार्ट सिटीचे समन्वयक कार्यकारी अभियंता सिकंदर अलीही आयुक्‍तांसह मुंबईला गेले होते. शुक्रवारी अपूर्व चंद्रा यांच्या दालनात पीएमसीसाठी इच्छुक मॅकन्जी, पीएच दोन एम आणि पीडब्ल्यूसी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील तीन संस्थांच्या प्रतिनिधींनी स्मार्ट सिटीसंदर्भातील सादरीकरण केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपूर्व चंद्रा यांनी संस्थांच्या सादरीकरणावर समाधान व्यक्‍त केले. शिवाय स्मार्ट सिटीच्या दृष्टीने जर त्यांची निवड झाली तर कसे काम करणार, याचा आराखडा आणि विकासासंदर्भात मास्टर प्लॅन तयार केल्यानंतर पुन्हा एकदा सादरीकरण पाहून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. शिवाय मास्टर प्लान तयार करताना त्यात सामाजिक व व्यावसायिकदृष्ट्या भर द्या, स्मार्ट सिटीमुळे सर्वसामान्य नागरिकांना काय लाभ होणार आहेत, जसे सिटी बससेवा, स्मार्ट पार्किंग, सेफ सिटी, आयटी सोल्युशनसंदर्भात काय व कसे करण्यात येणार आहे. शहरात पर्यटनवाढीच्या खूप मोठ्या संधी असल्याने पर्यटकांच्या दृष्टीने शहरात काय नियोजन करणार आहात, याचा मास्टर प्लानमध्ये समावेश असला पाहिजे, अशा सूचना केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पीएमसीचा निर्णय महिनाभरात 
दुसऱ्यांना सादरीकरण झाल्यानंतर पीएमसीची निवड अंतिम केली जाणार आहे. पीएमसी नियुक्‍ती महिनाभरात होण्याची शक्‍यता असून, पीएमसीची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटीला मिळणाऱ्या निधीत आणखी वाढ होऊ शकते. पहिल्या टप्प्यात 92 कोटींचा निधी वितरित करण्याविषयी कोषागार कार्यालयास पत्र प्राप्त झाले असून, शनिवारी हा निधी एसपीव्हीच्या खात्यात वर्ग होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली. 

Web Title: 92 crore funds for the Smart City