चाकूर तालुक्यातील 125 शाळांतील 99 वर्गखोल्या मोडकळीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

चाकूर तालुक्‍यातील 125 शाळांतील 99 वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून, या धोकादायक वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी तीन वर्षांपासून शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. 

चाकूर ः तालुक्‍यातील 125 शाळांतील 99 वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून, या धोकादायक वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी तीन वर्षांपासून शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. 
शासनाची उदासीनता, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट बनली असून, यामुळे विद्यार्थी खासगी शाळेत प्रवेश घेताना दिसत आहेत. तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या 125 शाळा असून, अकरा हजार पाचशे विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांसाठी सहाशे वर्गखोल्या आहेत. या खोल्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले असता 99 वर्गखोल्या धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळा दुरुस्तीसाठी अनुदान दिले जाते. मात्र मागील तीन वर्षांपासून सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत एक रुपयाही निधी प्राप्त झाला नसल्याने दुरुस्ती होत नाही.

त्यामुळे मोडकळीस आलेल्या धोकादायक वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. पाऊस पडला तर पाणी वर्गात येते, कधी कधी भिंतींचा गिलावा विद्यार्थ्यांच्या अंगावर पडतो. यामध्ये जानवळ 7, नांदगाव 6, नागेशवाडी 5, चाकूर 4, घारोळा 4, हणमंतवाडी, नायगाव, शंकरवाडी, ब्रह्मवाडी, अजनसोंडा (खु), यलमवाडी, राजेवाडी, घरणी, हणमंतवाडी, लिंबवाडी, मष्णेरवाडी, मोहदळ, कडमुळी, झरी (खु), झरी (बु), रामवाडी, रायवाडी, शिवणखेड, मांडरुकी या शाळेतील प्रत्येकी एक वर्गखोली, तर राचन्नावाडी, तिवघाळ, कबनसांगवी, धनगरवाडी, महाळंग्रा, कुंभेवाडी, बावलगाव, टाकळगाव, आनंदवाडी, मोहनाळ, मुरंबी, हाडोळी कवठाळी, दापक्‍याळ, माहूरवाडी, गांजूरवाडी या शाळेतील प्रत्येकी दोन, दापक्‍याळ, कवठाळी, उजळंब, वडवळ नागनाथ, नळेगाव, आटोळा, हिंपळनेर येथील प्रत्येकी तीन अशा 48 गावांतील शाळांच्या 99 वर्गखोल्या मोडकळीस आल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत.

काही गावांत खिळखिळ्या झालेल्या धोकादायक इमारती व मोडकळीस आलेल्या भिंतीला बाहेरून रंगरंगोटी करून वरवरून साज चढविण्याचे काम करण्यात आले आहे. परंतु आतून मात्र या खोल्या जीवघेण्या बनल्या आहेत. हाच रंगरंगोटीचा खर्च शाळा दुरुस्तीसाठी केला असता तर थोडेफार चांगले काम झाले असते. शाळा दुरुस्तीच्या कामासाठी सर्व शिक्षा अभियान, जिल्हा नियोजन समिती, आमदार, खासदार निधीतून निधी दिला जाऊ शकतो. सर्व शिक्षा अभियानातून गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे या खोल्यांची दुरवस्था झाली आहे. 
 
 

तालुक्‍यातील सर्व शाळांतील वर्गखोल्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. मोडकळीस आलेल्या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त होणार असून, यातून दुरुस्ती केली जाणार आहे. 
- वंदना फुटाणे, गटशिक्षणाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 99 classrooms in 125 schools in bad condition