
पावलं थकली; मन नाही थकलं!
भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी (उदगीर) - विविध लोकगीते, अभंग, स्फूर्तिगीते यावर थिरकणारी चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंतची पावलं, चित्ररथातून सामाजिक संदेश अन् लातूर जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख, डोक्यावर ज्योत घेऊन काळजाचा थरकाप उडविणारे चित्तथरारक नृत्य, जागोजागी फुलांच्या पाकळ्या उधळून होणारे स्वागत, उत्साहाला आलेले उधाण, कधी मुखी छत्रपती ‘शिवराय की जय’ तर कधी ‘भारत माता की जय’ अशा गगनभेदी गर्जना अशा उत्साहपूर्ण वातावरणात येथील ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची शुक्रवारी (ता. २२) सकाळी ग्रंथदिंडी निघाली. ग्रंथदिंडी निघालेले तीन ते चार किलोमीटरचे अंतर अन् संथपणे पुढे जाणाऱ्या एका-एका रथामुळे पावलं थकत होती; पण मन मात्र थकत नव्हतं.
जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरून सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य समन्वयक दिनेश सास्तूरकर यांच्या उपस्थितीत ग्रंथपूजन करून दिंडीला सुरुवात झाली. मूर्तिशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर उपस्थित होते. ग्रंथदिंडीच्या सुरुवातीला सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकाच्या वेशभूषेत संचलन केले. त्या पाठोपाठ मयूररथ होता. या ग्रंथदिंडीमध्ये ८० शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कलाविष्कार सादर केला. विविध विषयांवरील चित्ररथ आकर्षण ठरले. ग्रंथदिडींच्या मार्गावर रांगोळी काढलेली होती. महत्त्वाच्या ठिकाणी फुले उधळून ग्रंथदिंडी स्वागत करण्यात आले. साक्षरता, भ्रूणहत्या नको, स्त्री-पुरुष आदी विषयांवर या ग्रंथदिंडीतून जनजागृती करण्यात आली.
विद्रोहीच्या सभामंडपापासून सुरुवात!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीची सुरुवात जिल्हा परिषद मैदानावर होऊ घातलेल्या १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या सभामंडपापासून झाली. त्यामुळे दोन संमेलनाचा यानिमित्त का होईना काही वेळासाठी संगम पाहायला मिळाला.
३० मिनिटे उशीर
ग्रंथदिंडीला ८ वाजता सुरुवात होणार होती. पण, ती साडेआठ वाजता सुरू झाली. दिंडीत सहभागी पहिल्या शाळेचे पथक १०.०७ मिनिटांनी संमेलनस्थळी पोचले. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे उदगीर शहरात ९.४५ मिनिटांनी आगमन झाल्याची माहिती मिळताच आतापर्यंत संथपणे चालणाऱ्या ग्रंथदिंडीला अचानक वेग आला.
मजुरांचे हाल
ग्रंथदिंडीतील ग्रंथांचे पूजन छत्रपती शिवराय चौकात झाले. या चौकाजवळच रोज सकाळी शहर आणि परिसरातील मजूर, कामगार येतात. याला कामगार नाका म्हणून नाव आहे. पण, शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडी आणि कामगारांची येथे एकत्र येण्याची वेळ एकच होती. रस्त्यावर रोजच्या प्रमाणे घोळक्याने कामगार उभे होते. परंतु, ग्रंथदिंडीमुळे त्यांना प्रशासनाने इतर ठिकाणी उभे राहण्यास सांगितले. त्या ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. त्यामुळे कामगारांकडे कुणी फिरकलेच नाही. परिणामी, एखादा-दुसरा कामगार वगळता इतरांना आल्या पावली परत जावे लागले. पण, त्यांनी ग्रंथदिंडीचा आनंद घेतला.
हे ठरले आकर्षण
फेटे बांधून ११ बुलेटस्वार महिला
फेटे बांधून १२० स्कूटीस्वार महिला
टी शर्ट, हेल्मेट घालून १२० सायकलस्वार
भगीरथ विद्यालयाचे विद्यार्थी क्रांतिसूर्य महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सहभागी
कोथळी जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख शिवशंकर
पाटील यांनी महात्मा गांधींची वेषभूषा केली.
घोडे पथक, बँड पथक, वारकरी भजनी मंडळ
लेझीम पथक, ढोल पथक, कवायत
महापुरुषांची वेशभूषा
राजस्थानी, कानडी, मराठी, बंगाली, मारवाडी वेशभूषा
विद्यार्थ्यांना नाचताना पाहून काही शिक्षकांचीही पावले थिरकली
हे खटकले
साहित्य संमेलनासाठी आलेल्या बहुतांश साहित्यिकांनी ग्रंथदिंडीकडे पाठ फिरवली. ग्रंथदिंडीसोबत बोटांवर मोजण्याइतकेच साहित्यिक दिसले. विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या अधिक होती. त्यातल्या त्यात मराठी माध्यमांच्या शाळा अधिक होत्या. इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोजक्याच होत्या.
अदृश्य हात शेकडो
ग्रंथदिंडी मार्गाची पहाटेच नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता केली. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रस्ता झाडून घेतला. धूळ उडू नये म्हणून त्यावर पाणी टाकले. संपूर्ण रस्त्याच्या कडेने तरुणी, महिला यांनी मोठ्या मेहनतीने रांगोळी रेखाटली, अशा अदृश्य शेकडो हातांमुळे ही दिंडी यशस्वी झाली.
Web Title: A Live View Of Maharashtras Folklore Through Granthdindi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..