कर्नाटकात स्वस्त मग महाराष्ट्रातच हमीभावाची सक्ती का?

हरी तुगावकर
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

मंगळवारी (ता. 4) येथे झालेल्या बैठकीत खरेदीदारांनी शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे दहाव्या दिवशीही लातूर बाजार समितीचा आडत बाजार बंदच राहिला आहे.

लातूर - कर्नाटकामध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी
सुरु आहे. तेथे शेतमाल स्वस्त मिळतो मग महाराष्ट्रातच हमीभावाची सक्ती
का? असा प्रश्न खरेदीदारांनी उपस्थितीत केला आहे. मंगळवारी (ता. 4) येथे
झालेल्या बैठकीत खरेदीदारांनी शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे दहाव्या दिवशीही लातूर बाजार समितीचा आडत बाजार बंदच राहिला आहे.

शासन व व्यापाऱ्यांच्या भांडणात मात्र शेतकरी भरडला जात आहे.
शेतमालाची हमीभावाने खरेदी केली नाही तर व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे
आदेशामुळे सध्या राज्यातील आडत बाजारात भितीचे वातावरण आहे. गेल्या दहा दिवसापासून आडत बाजार बंद आहे. नवीन कायदा झालेला नाही असे शासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. तरी देखील व्यापाऱ्यांच्या मनातील भिती अद्याप निघालेली नाही. याचा परिणाम आडत बाजारावर दिसून येत आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीतही यावर तोडगा निघालेला नाही.

त्यात मंगळवारी येथील खरेदीदारांची बैठक झाली. शासनाच्या धोरणावर
यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. कर्नाटक राज्यात हमीभावापेक्षा एक ते दोन हजार रुपये कमी दराने शेतमालाची खरेदी सुरु आहे. तेथे सक्ती केली जात नाही. त्यामुळे तेथील व्यवहार सुरळीत सुरु आहेत. पण महाराष्ट्रातच मात्र हमीभावाची सक्ती केली जात आहे. हमीभावाने खरेदी केली नाही तर कारवाई केली जात आहे. हे चुकीचे आहे. हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यास यावेळी खरेदीदारांनी असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे दहाव्या दिवशीही येथील आडत बाजार बंदच राहिला आहे. शासन व व्यापाऱ्यांच्या भांडणात मात्र शेतकरी भरडला जात आहे.

शासनच हमीभावापेक्षा कमी भावाने तूर बाजारात आणत असून व्यापाऱ्यांना मात्र हमीभावाची सक्ती करीत आहे. आडत बाजारात येणाऱ्या शेतमालाला हमीभाव लागू नसावा. ज्या शेतकऱ्याला हमीभावाने आपला माल विकायचा असेल तर त्यांनी शासनाच्या खरेदी केंद्रावर विकला पाहिजे. कोणताही व्यापारी शेतकऱ्यावर शेतमाल आम्हालाच द्यावा अशी सक्ती करीत नाही. आम्ही बाजार बंद ठेवलेला नाही. हमीभावाने खरेदी करण्यास आम्ही असमर्थ आहोत. कोणताही व्यापारी तोट्याचा व्यवहार करणार नाही.
- पांडूरंग मुंदडा, अध्यक्ष, श्री ग्रेन सि़डस अॅण्ड आॅईल मर्चंट असोसिएशन

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aadat market of latur market commitee is closed