अंबाजोगाईच्या आदित्य गिरीचा अमेरिकेत ‘गुगल’कडून सन्मान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

अंबाजोगाई - गतवर्षी ‘गुगल’ने घेतलेल्या जागतिक सॉफ्टवेअर स्पर्धेत विजेता ठरलेल्या आदित्य दत्तात्रय गिरी याचा बुधवारी (ता. २७) पहाटे अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे गुगलचे संचालक क्रिस डिबोना यांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदित्य हा अंबाजोगाई पंचायत समितीतील गटविकास अधिकारी दत्तात्रय गिरी यांचा मुलगा आहे. 

गुगलकडून मागील सात वर्षांपासून १८ वर्षांखालील मुलांना सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक स्तरावर (कोड इन) स्पर्धा घेण्यात येते. वर्ष २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ७८ देशांतील तीन हजार ५५५ मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेअंती ५० मुलांना गुगलने विजेते घोषित केले. या जागतिक ५० विजेत्यांमध्ये आदित्य गिरी याचा समावेश असून, तो भारतातून १६वा, तर महाराष्ट्रातून एकमेव होता. 

आदित्य नुकताच बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. बालपणापासूनच त्याला संगणक क्षेत्राचे प्रचंड आकर्षण आहे. नववीच्या वर्गात असताना त्याने ऑनलाइन मतदानाचे सॉफ्टवेअर तयार करून निवडणूक आयोगास पाठवले होते. त्यावरदेखील सध्या शासकीय पातळीवर विचार सुरू आहे. कोणाचेही मार्गदर्शन न घेता त्याने गुगलच्या जागतिक स्पर्धेत यश मिळवले. या यशाबद्दल आदित्य आणि त्याच्या पालकांना गुगलच्या वतीने अमेरिका आणि गुगलच्या मुख्य कार्यालयास भेट देण्याची संधी मिळाली. मंगळवारी (ता. २६) दुपारी दोन वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे २.३० वाजता) आदित्यचा अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे गुगलचे संचालक क्रिस डिबोना यांच्या हस्ते पारितोषिक, गुगल पिक्‍सेल-२ मोबाईल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जगभरातून आलेले या स्पर्धेतील विजेते हजर होते.

Web Title: aaditya giri honor by google