रॅन्समवेअर व्हायरसमुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

औरंगाबाद - रॅन्समवेअर व्हायरसचा धोका लक्षात घेता एअरपोर्ट अथॉरिटीने खासगी चार्टर्ड विमानांच्या उड्डाणास तात्पुरती परवानगी नाकारली. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा बुधवारचा (ता. 17) नियोजित औरंगाबाद दौरा रद्द झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीने शहरात विविध कामांचे भूमिपूजन करण्यात येणार होते.

औरंगाबाद - रॅन्समवेअर व्हायरसचा धोका लक्षात घेता एअरपोर्ट अथॉरिटीने खासगी चार्टर्ड विमानांच्या उड्डाणास तात्पुरती परवानगी नाकारली. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा बुधवारचा (ता. 17) नियोजित औरंगाबाद दौरा रद्द झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीने शहरात विविध कामांचे भूमिपूजन करण्यात येणार होते.

महापालिका प्रशासन व शिवसेनेने ठाकरे यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी केली होती. मात्र, हा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी आणि महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

महापालिकेच्या वतीने दलित वस्ती विकास कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांसह शिवाजीनगर येथील आदर्श रस्त्याच्या कामाचा प्रारंभ, आरोग्य केंद्राचे भूमिपूजन, आमदार, खासदार निधीतून झालेल्या विकासकामांचे लोकार्पण अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील शिवसंपर्क मोहिमेच्या आढावा बैठकीस उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्यसुद्धा उपस्थित राहणार होते. मात्र, तेव्हाही त्यांचा दौरा रद्द झाला होता. वर्षभराने आदित्य शहरात येणार असल्यामुळे शिवसैनिक व युवासैनिकांमध्ये उत्साह होता. परंतु, चार्टर्ड विमानाच्या उड्डाणाला परवानगी नाकारल्यामुळे त्यावर पाणी फेरले गेले. दरम्यान, औरंगाबाद येथील विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले, की चार्टर विमान येणार असले तेव्हा प्राधिकरणाला काही करावे लागत नाही. उलट प्राधिकरणाला पैसे मिळत असतात. मंगळवारी (ता. 16) एक चार्टर विमान येऊन गेले आहे. चार्टर विमान आल्यानंतर त्याचे ग्राउंड हॅण्डलिंग करण्याचे काम प्राधिकरण नव्हे; तर वेगळी कंपनी करते.

कदाचित त्या कंपनीकडून काही त्यांना कळवण्यात आले असावे. बुधवारी सकाळी दहा वाजता एक चार्टर विमान येणार असल्याचे ग्राउंड हॅण्डलिंग कंपनीकडून प्राधिकरणाला सोमवारी (ता. 15) कळवण्यात आले होते; मात्र त्याचे मंगळवारी रात्रीपर्यंत कन्फर्मेशन आलेले नव्हते.

विमानतळांना दक्षतेचा इशारा
रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या सर्व खात्यांना इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बॅंका, विमानतळ संरक्षण यंत्रणा, हॉस्पिटल व शेअर बाजाराला दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाने खासगी चार्टर्ड विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातल्याचे कळते.

Web Title: aaditya thackeray tour cancel by ransomware virus