कोपर्डीच्या आरोपींना फाशी दिली की नाही?

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

दोन क्विंटल फुलांच्या हाराचा मोह
आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेत आहेत; पण शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेणाऱ्या ठाकरेंना दोन क्विंटल फुलांच्या हाराचा मोह आवरला नाही. रविवारी त्यांच्या स्वागताला रस्त्यावर क्रेनच्या साह्याने लटकविलेल्या हाराला थांबून त्यांनी स्पर्श करीत त्याचा स्वीकार केला.

बीड - गाय कापणाऱ्यांचे हातपाय तोडले पाहिजेत असे विचारल्यानंतर, माईला हात लावणाऱ्यांचेही हातपाय तोडले पाहिजेत, असे मी म्हणालो. मात्र, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली की नाही, हे मला माहीत नव्हते, म्हणून आपण पाठपुरावा केला नव्हता. मात्र, आपण सरकारकडे पाठपुरावा करू, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. 

बीड शहरात रविवारी (ता. चार) आदित्य ठाकरे यांनी आदेश बांदेकर यांच्यासोबत शहरात युवती-महिलांशी संवाद साधला. या वेळी अंजली इंगोले या युवतीने कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली; पण आपले सरकार एवढे अक्षम का, की त्याची अंमलबजावणी का झाली नाही,’ असा प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘मुलगी कुठेही, कधीही गेली, कसलेही कपडे घालून गेली तरी तिला हात लावायची हिंमत झाली नाही पाहिजे. 

तिला हात लावायचा कोणालाही अधिकार नाही. मात्र, न्याय प्रक्रियेत वेळ लागतोय. तोच आरोपी आहे का, तो बोलतोय ते सत्य आहे का, हे तपासावे लागते. मात्र, तुमचाही प्रश्‍न बरोबर आहे. सरकारबरोबर आपण हा विषय घेणार आहे. मला माहीत नव्हते त्याला फाशी झाली आहे का, म्हणून पाठपुरावा केला नव्हता.’’ 

प्रश्‍नांना आश्वासक उत्तरे
या वेळी युवती व महिलांनी विचारलेल्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी आश्वासक उत्तरे दिली. काही प्रश्‍न वैयक्तिक, तर काही सार्वजनिक स्वरूपाचे होते. डॉ. संध्या जोगदंड यांच्या दुष्काळ आणि आत्महत्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी शिवसेनेकडून सामुदायिक विवाह, दुष्काळी मदत दिल्याचे सांगितले. तर, या भागात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले. पुणे-मुंबई या भागातील तरुणांना नोकरी मिळण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल आवश्‍यक असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे. छेडछाडीच्या मुद्यावर स्वसंरक्षणाचे धडे गिरविण्याचा सल्ला देण्यासह स्वबचावाचे उपायही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aaditya Thackeray Tour Janaashirvad Yatra Politics