लोकसहभागच एकमेकांची ऊर्जा वाढवतोय : आमीर खान

सुशांत सांगवे
बुधवार, 2 मे 2018

आमीर म्हणाला
- आपण अनेकजण शिक्षित आहोत; पण जागरूक नाहीत
- राज्य सरकारचा जलशिवार हा अत्यंत चांगला उपक्रम
- गावागावांत चित्रपटगृह असते तर दुष्काळाविरुद्धची लढाई अधिक सोपी झाली असती
- जास्त वेळ मी सामाजिक कामासाठी देत आहे; म्हणून माझे चित्रपट पाहायला मिळत नाहीत

लातूर : गावं दुष्काळमुक्त करण्यासाठी, गावं पाणीदार करण्यासाठी गावागावातील लोक एकत्र येत आहेत. आपल्या प्रत्येकाची ही एकजूट, हा लोकसहभागच एकमेकांची ऊर्जा वाढवतोय", असा विश्वास अभिनेता आमिर खान याने व्यक्त केला. गावांनंतर शहरातील लोकांना एकत्र आणून शहरं पाणीदार करणार आहे, त्यावर सध्या काम सुरू आहे, असंही आमिर म्हणाला.

पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत महाश्रमदान हा उपक्रम आमिरने हाती घेतला आहे. या निमित्ताने तो आणि अभिनेत्री आलिया भट यांनी औसा तालुक्यातील फत्तेपुर या गावात येऊन गावकऱ्यांसोबत मंगळवारी श्रमदान केले. या वेळी दोघांनीही पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.
 
आमिर म्हणाला, "मला प्रसिद्धी मिळावी, माझे चित्रपट चालावेत म्हणून मी हे काम हाती घेतलेले नाही. हा इव्हेंटही नाही. बास् दुष्काळ नाहीसा व्हावा आणि गावं पाणीदार व्हावेत हाच एकमेव हेतू आहे. या कामासाठी आम्ही गावं आधी निवडली. कारण, गावागावांतील परिस्थिती खरोखरीच भीषण आहे. म्हणून आधी इथे काम होणे जास्त गरजेचे आहे. आम्हाला शहरांमध्ये जे पाणी मिळते तेही कुठल्यातरी गावातीलच असते. गावं पाण्याने समृद्ध झाली की मग शहरांमध्येही असेच पण वेगळे उपक्रम हाती घेणार आहोत आणि मला विश्वास आहे, या कामात शहरातील लोक साथ देतील. अशा एकजुटीतूनच आपण दुष्काळविरुद्धची लढाई जिंकू शकू."

आप ना होते, तो हम ना होते
"मी इथं येऊन श्रमदान करतेय आणि तुमच्यावर उपकार करतेय, असं अजिबात नाही. खरंतर उलटं आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही शहरातील लोक आहोत. अगर आप ना होते, तो हम ना होते", असं म्हणत आलियाने गावकऱ्यांशी संवाद साधला. इथं आल्यानंतर सुरवातीला श्रमदान कसं करायचं, हे माहिती नव्हतं. त्यामुळे या खडकाळ भागात मी एकीकडे पडत होते तर टोपले दुसरीकडे. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी जसे रिटेक द्यावे लागतात तसे रिटेक इथे करत होते. त्यातुनच शिकत गेले. खरे श्रम काय असतात, हे कळले, जेव्हा हाताला फोडं आली; पण मी पुन्हा येणार आहे. कारण आम्ही शहरातील लोकं चार भिंतीत विकासाच्या गप्पा मारतो; पण अशा दुष्काळी भागात येतो, त्यावेळी कळतं की आपण खरं कुठं आहोत, हे चित्र पाहून दुःख होतं, अशा भावनाही आलियाने व्यक्त केल्या.

आमीर म्हणाला
- आपण अनेकजण शिक्षित आहोत; पण जागरूक नाहीत
- राज्य सरकारचा जलशिवार हा अत्यंत चांगला उपक्रम
- गावागावांत चित्रपटगृह असते तर दुष्काळाविरुद्धची लढाई अधिक सोपी झाली असती
- जास्त वेळ मी सामाजिक कामासाठी देत आहे; म्हणून माझे चित्रपट पाहायला मिळत नाहीत

Web Title: Aamir Khan talked about Pani foundation work