आपले सरकार सेवा केंद्राला इंटरनेटचे ग्रहण!

अविनाश काळे
Friday, 23 October 2020

मोबाईलवर करावी लागताहेत कामे ; आय. डी. पासवर्ड भाड्याने देण्याचा प्रकार थांबेल का ? 

उमरगा (उस्मानाबाद) : ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत विविध प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुरू झालेले ग्रामपंचायत स्तरावरील "आपले सरकार सेवा केंद्र" (संग्राम केंद्र) गैरसोयीचे ठरत आहे. बीएसएनएलने इंटरनेटची जोडणी दिली खरी; पण एक वर्षाहुन अधिक काळापासून इंटरनेट सेवाच सुरू होत नसल्याने संगणक परिचालकांना मोबाईलचा वापर करून नागरिकांना प्रमाणपत्र द्यावे लागत आहे. दरम्यान कांही संगणक परिचालकांनी संबंधित गावाची सीमा ओलांडून शहरात अथवा इतर ठिकाणी परस्पररित्या स्वतःचा आय.डी. पासवर्डचा वापर करून प्रमाणपत्र देण्याचा नियमबाह्य प्रकार सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
इंटरनेटच्या जमान्यात नागरिकांना ऑनलाईनचा पर्याय स्विकारावा लागत आहे. विविध शासकिय, निमशासकिय कार्यालयही इंटरनेटने जोडलेले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने वेळेल मिळण्यासाठी "आपले सरकार सेवा केंद्र" सुरू केले. डिसेंबर २०१६ पासुन केंद्र सुरू झाले असून तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींसाठी ६७ संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली. मात्र  केंद्र सुरू झाल्यापासुन अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इंटरनेट सेवेची यंत्रणा कुचकामी !
भारतीय दूरसंचार निगमने (बी.एस.एन.एल.) ६७ केंद्रासाठी इंटरनेट सेवेची यंत्रणा उभी केली. मात्र वर्षभराचा कालावधी लोटला तरी ही सेवा सुरू झालेली नाही. बी.एस.एन.एल. कार्यालयाला वारंवार पत्र देऊनही उपयोग होत नाही. त्यामुळे संगणक परिचालकांना मोबाईलचा वापर करून प्रमाणपत्र काढावे लागत आहेत. शिवाय पिक विमा भरण्याचे काम करावे लागत आहे. त्यात मोबाईलला रेंज नसल्याने अडचणी येताहेत. त्यामुळे वेळेत प्रमाणपत्र मिळत नाहीत. दरम्यान संगणक परिचालकांना जुलै महिन्यापासूनचे मानधन मिळालेले नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आय. डी. पासवर्डचा होतोय गैरवापर ! 

संगणक परिचालकांना त्यांच्या आधारलिंकनुसार आय.डी. पासवर्ड दिलेला आहे. ज्या त्या केंद्राने नेमून दिलेल्या गावातील विविध ई - प्रमाणपत्र देण्याच्या सूचना आहेत. मात्र कांही जणांनी शहरात आय.डी. पासवर्डचा वापर करून तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांचे प्रमाणपत्र काढण्याचा परस्पर प्रकार सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. कांही जणांनी आय.डी. पासवर्ड भाड्याने  दिल्याचे सांगण्यात येत आहे, तेथून विविध प्रमाणपत्र काढले जात आहेत. दरम्यान हा प्रकार ग्रामसेवक व सरपंचाला अंधारात ठेवून केला जात असून या संदर्भात गटविकास अधिकारी, सीएससी यांनी सखोल चौकशी केली तर खरा प्रकार उघडकीस येईल आणि गैरप्रकार थांबेल.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aaple government center not get internet