लहान लहान माणसांनीही आत्मचरित्रे लिहिली पाहिजेत - जयदेव डोळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

औरंगाबाद - गावातून शहरात आलेला प्रत्येकजण कुठेतरी दुरावलेपण अनुभवत असतो. कितीतरी दुःख अनुभवत असतो. आपली सुख-दुःखे हस्तांतरित केली पाहिजेत. त्यासाठी अगदी लहान लहान माणसांनीही आत्मचरित्रे लिहिली पाहिजेत, असे प्रतिपादन विचारवंत जयदेव डोळे यांनी सोमवारी (ता. २६) केले. डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या आत्मकथनपर पुस्तकावरील परिसंवादात ते बोलत होते.

औरंगाबाद - गावातून शहरात आलेला प्रत्येकजण कुठेतरी दुरावलेपण अनुभवत असतो. कितीतरी दुःख अनुभवत असतो. आपली सुख-दुःखे हस्तांतरित केली पाहिजेत. त्यासाठी अगदी लहान लहान माणसांनीही आत्मचरित्रे लिहिली पाहिजेत, असे प्रतिपादन विचारवंत जयदेव डोळे यांनी सोमवारी (ता. २६) केले. डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या आत्मकथनपर पुस्तकावरील परिसंवादात ते बोलत होते.

प्रगतिशील लेखक संघातर्फे लेखक, समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या ‘झाकोळलेल्या वाटा’ या पुस्तकावर सोमवारी (ता. २६) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, सोलापूर येथील प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, माध्यमतज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. मुलाटे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीपाद जोशी म्हणाले, की डॉ. मुलाटे हे केवळ लेखक नव्हेत, तर वाङ्‌मयीन चळवळीचे महत्त्वाचे शिलेदार आहेत. प्रगतिशील हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या मुलाटे यांच्या नावाचा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विचार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

समीक्षक प्राचार्य कदम म्हणाले, की लेखकाची जातिअंताची भूमिका महत्त्वाची आहे. सबंध पुस्तकात लेखक परिस्थितीशरण वाटला, तरी दरवेळी एक पाऊल पुढे टाकून उभारी घेण्याची त्यांची चिकाटी जागोजागी दिसून येते. पुस्तकावर भाष्य करताना प्रा. डोळे म्हणाले, की आपल्याजवळची माणसे कितीतरी दुःखे भोगत असतात; पण त्यांनी ते लिहिल्याशिवाय लोकांना कळणार कशी? ‘झाकोळलेल्या वाटा’ हे अभावग्रस्त माणसाचे नोंदणीपुस्तक आहे. अभावाने ग्रासलेल्या मराठवाड्यातील जवळपास सगळ्यांचेच ते आत्मचरित्र वाटते. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. बोराडे यांनी, वास्तवाशी इमान राखलेले साहित्य हे केवळ त्या माणसाच्या जगण्याचा इतिहास राहत नाही, तर तो संपूर्ण काळ आपल्यापुढे उभा करते, असे म्हटले. कवयित्री प्रिया धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, कवी फ. मुं. शिंदे, रुस्तुम अचलखांब, दासू वैद्य, डॉ. संजीवनी तडेगावकर, प्रगतिशील लेखक संघाचे डॉ. वीरा राठोड, डॉ. कैलास अंभुरे, प्रा. समाधान इंगळे, संगीता महाजन, सिद्धांत मोगले, उत्तम बावस्कर या वेळी उपस्थित होते.

Web Title: aaurangabad marathwada news jaydev dole talking