जुन्या रिक्षांच्या बदली परवान्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

औरंगाबाद - राज्यात रिक्षा परमिट (परवाना) खुले केल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी औरंगाबादेत जुन्या रिक्षांना बदली परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या निर्णयानंतर सात महिन्यांनी आणि परिवहनमंत्र्यांच्या घोषणेनंतर चार महिन्यांनी प्रादेशिक प्राधिकरण समितीने हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, बैठकीच्या निर्णयावरही तब्बल २२ दिवसांनंतर स्वाक्षरी झाली. 

गतिमान प्रशासनाच्या घोषणेला मात्र हरताळ फासण्याचे काम प्राधिकरण समितीने केल्याने रिक्षाचालक व संघटनांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.  

राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीच्या उद्देशाने अनेक वर्षांपासून बंद असलेले रिक्षा परमिट खुले करण्याचा निर्णय शासनाने जून महिन्यात घेतला होता. परमिट खुले झाल्यानंतर भाड्याने परमिट घेऊन उपजीविका करणाऱ्यांना स्वत:चे परमिट घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता; मात्र औरंगाबाद प्रादेशिक परिवहन समितीने यापूर्वीच वाहन बदली प्रकरणात नवीन रिक्षालाच परमिट लागू करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे ज्यांच्याकडे एक-दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या जुन्या रिक्षा आहेत, त्यांना या निर्णयाचा उपयोग झाला नव्हता. त्यानंतर चार महिन्यांनी म्हणजे २२ सप्टेंबर २०१७ रोजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी खासगी व जुन्या रिक्षांनाही ३१ मार्चपर्यंत अधिकृत करण्याची घोषणा औरंगाबादेत केली. या दोन्ही निर्णयांमुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळाला; मात्र हा दिलासा प्राधिकरण समितीने औरंगाबादेत रिक्षाचालकांना मिळू दिला नाही. कारण पूर्वीच्या वाहन बदली प्रकरणात नवीन ऑटो रिक्षाच असावी, असा ठराव प्राधिकरण समितीला विखंडित करणे आवश्‍यक होते; मात्र प्राधिकरण समितीची प्रत्येक तीन महिन्यांनी अपेक्षित असलेली बैठकच झाली नाही. यापूर्वीची बैठक २७ फेब्रुवारी रोजी झाली होती, त्यानंतर थेट १८ डिसेंबरला बैठक झाली, वर्षाच्या शेवटच्या बैठकीत पूर्वीचा ठराव रद्द करून बदली प्रकरणात व जुन्या वाहनांनाही नवीन परमिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतला; मात्र या निर्णयाच्या ठरावावरही तब्बल २२ दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ठराव घेतला असला, तरीही नवीन परमिटवर जुन्या रिक्षा किंवा खासगी रिक्षा बदली करून घेण्यासाठीची शासनाची मुदत ३१ मार्च रोजी संपणार असल्याने रिक्षाचालकांना अवघ्या दोन महिन्यांत जुन्या रिक्षांच्या बदली परमिटचे काम पूर्ण करून घ्यावे लागणार आहे.

रिक्षा परमिट खुले होऊन सात महिने उलटले, त्यानंतर प्रदेशिक परिवहन समितीने जुन्या रिक्षांना व खासगी रिक्षांना परमिट देण्याचा निर्णय घेतला. आता केवळ दोन महिनेच राहिलेले आहेत. या काळात रिक्षचालकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दमछाक होईल. त्यामुळे ३१ मार्चची मुदत वाढवून दिली पाहिजे.
- निसार अहेमद, अध्यक्ष, रिक्षाचालक-मालक संयुक्त कृती समिती

Web Title: aaurangabad news Free Route for the replacement of old rickshaw