इच्छुकांना "एबी' फॉर्मचे टेन्शन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापपर्यंत आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. त्यामुळे बुधवारी (ता. एक) शेवटच्या दिवशीच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. दरम्यान, काही इच्छुक उमेदवारांना पक्षाने फोनवर संदेश पाठवून तुमचे "एबी' फॉर्म पक्के असल्याचा निरोप दिला आहे. 

उमेदवारी अर्जाचा बुधवार शेवटचा दिवस आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी आपले अर्ज तयार ठेवले आहेत. मात्र, भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 1 फेब्रुवारीलाच एबी फॉर्म हातात मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आपल्याला पक्षाचा एबी फॉर्म मिळणार का, याचे टेन्शन अनेक इच्छुकांना आले आहे. दरम्यान, बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी काही उमेदवारांना गुपचूपपणे एबी फॉर्म निश्‍चित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

इच्छुकांच्या उड्यांनी नेत्यांना बंडखोरीची चिंता 
भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. यामध्ये काही गटांत तर अनेक उमेदवारांच्या उड्या पडल्या आहेत. त्यामुळे या गटांमध्ये बंडखोरी होण्याची शक्‍यता असल्याने शेवटपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे धोरण प्रमुख पक्षांनी घेतले आहे. तरीही प्रमुख पक्षांना बंडखोरीची लागण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

इच्छुकांना धाकधूक 
कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार आणि चिन्हासाठी पक्षाचे एबी फॉर्म लागतात. मात्र, पक्षांची यादी जाहीर झाली नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. आपल्यालाच एबी फॉर्म मिळावा, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. काही इच्छुकांना नेत्यांनी फोन करून तुमचे एबी फॉर्म पक्के असून, तयारीला लागण्याचा संदेश पाठविला आहे. शिवसेना, भाजप युती नसल्याने त्यांच्या इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे; तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची काही गटांत आघाडी होणार असल्याने काही इच्छुकांचे पत्ते जवळपास कट होणार आहेत. 

Web Title: AB forms tension