शिक्षकांमध्ये जगाला तारण्याची क्षमता - रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

नांदेड - बेसुमार वृक्षतोडीच्या तुलनेत सिमेंटच्या जंगलात वाढ होत असल्याने नैसर्गिक संकटे ओढवत आहेत. बालमनावर पर्यावरणाचे महत्त्व रुजवण्यासाठी चौथी ते सातवीच्या अभ्यासक्रमात पर्यावरणाच्या धड्यांचा समावेश आवश्‍यक आहे. पर्यावरण जागृतीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. कारण शिक्षकांमध्येच जगाला तारण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रामदास कदम यांनी येथे केले.

शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षाअंतर्गत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाच्या "शिक्षणाची वारी' या विभागस्तरीय उपक्रमास बुधवारी चांदोजी पावडे मंगल कार्यालयात सुरवात झाली. त्या वेळी पालकमंत्री कदम बोलत होते. "शिक्षणाची वारी' हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगून कदम म्हणाले, की नैसर्गिक आरिष्ट रोखण्यासाठी "झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश देत आपण दरवर्षी कोट्यवधी वृक्षलागवड करत आहेत.

प्रत्यक्षात किती झाडे जगतात, हा चिंतनाचा विषय आहे. प्रत्यक्षात बेसुमार वृक्षतोडीच्या तुलनेत वृक्षसंवर्धन कमी होत असल्याने ओझोनचा थर कमी होऊन उष्णतेच्या प्रमाणात वाढ होत आहे. हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळीची संकल्पना शाळेच्या माध्यमातूनच कृतीत उतरली. प्लॅस्टिक बंदीच्या सक्षम अंमलबजावणीसाठी जागृतीची गरज आहे.

Web Title: The ability of the teacher to deliver the world Ramdas Kadam