औरंगाबाद जिल्ह्यात शाळा नावालाच डिजिटल 

संदीप लांडगे
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

 शाळा म्हणजे अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन व व्यवस्थापन या कामकाजाचे वर्गीकरण होय. ज्या शाळा या बाबी इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या आधारे चालतात; त्या शाळेला डिजिटल शाळा असं म्हणता येईल. जिल्ह्यात 2,076 शाळा आहेत. त्यापैकी एक हजार पाचशे शाळा संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. मात्र, वीजबिल थकल्याने शाळांची वीज खंडित केली आहे. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना वीजबिल भरण्याचे आदेश दिले आहेत; मात्र अनेक शाळांनी वीज न भरल्यामुळे शाळेतील संगणकीय साहित्य धूळखात आहे. 

औरंगाबाद -  शाळा म्हणजे अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन व व्यवस्थापन या कामकाजाचे वर्गीकरण होय. ज्या शाळा या बाबी इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या आधारे चालतात; त्या शाळेला डिजिटल शाळा असं म्हणता येईल. जिल्ह्यात 2,076 शाळा आहेत. त्यापैकी एक हजार पाचशे शाळा संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. मात्र, वीजबिल थकल्याने शाळांची वीज खंडित केली आहे. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना वीजबिल भरण्याचे आदेश दिले आहेत; मात्र अनेक शाळांनी वीज न भरल्यामुळे शाळेतील संगणकीय साहित्य धूळखात आहे. 

जिल्ह्यात डिजिटल शाळा बनवण्यासाठी शिक्षक, सामाजिक संस्था व गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सुमारे दीड हजार शाळा डिजिटल केल्या. त्यासाठी लागणारे ई-लर्निंग साहित्य जसे की, संगणक, मोबाईल, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, प्रोजेक्‍टर, इंटरऍक्‍टिव्ह बोर्ड इत्यादी इलेक्‍ट्रॉनिक साधनांची जमवाजमव करून शाळेला डिजिटलचा दर्जा दिला. या उपकरणाच्या माध्यमातून मुलांना अक्षरओळख, अंकलिपी, पाढे, कविता, गाणे, गोष्टी, बोधकथा शिकवल्या जातात. यामुळे मुलांचे शाळेत मन रमू लागले. मात्र, जिल्ह्यातील 735 शाळांचे वीजबिल थकल्यामुळे महावितरणकडून वीज खंडित करण्यात आली होती.

याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या सीईओंनी ग्रामपंचायतींना वीजबिल थकलेल्या शाळांचे बिल भरण्याचे आदेश दिले आहेत; मात्र अद्याप अनेक ग्रामपंचायतींनी शाळांचे वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी ई-लर्निंगपासून वंचित राहत आहेत. पैठण, गंगापूर व औरंगाबाद तालुक्‍यातील बहुतांश शाळा डिजिटल झाल्या आहेत. कन्नडमध्ये दोनशे शाळा डिजिटल झाल्या आहेत. 

इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या 
आधारे शाळेतील कामे :

- संगणक व इतर तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण (ई-लर्निंग) 
- संगणकाद्वारे मूल्यमापन (ऑनलाइन एक्‍झामिनेशन) 
- शाळा व्यवस्थापन प्रणाली (स्कूल मॅनेजमेंट) 

फायदे 
 
- विद्यार्थ्यांची गळती होत नाही, उपस्थिती टिकून राहते. 
- खडू, फळाविरहित दप्तराच्या ओझ्याविना शिक्षणाकडे वाटचाल 
- घोकमपट्टीतून मुलांची सुटका 
- विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित राहते, नवीन विश्वात विद्यार्थी रममाण 
- संगणकाच्या माध्यमातून कायमस्वरूपी स्मरणात राहते 
- विद्यार्थी स्वयंमूल्यमापन व स्वयंअध्ययन करतात 
- विद्यार्थ्यांचा अध्ययनाचा वेग वाढतो 
- शिक्षणाची गुणवत्ता वाढते, शाळेविषयी आवड निर्माण होते 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About digital school issue