आयटीआय प्रवेश फेरीच्या वेळापत्रकात बदल

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद-  राज्यातील पूरपरिस्थितीमुळे शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील प्रवेश फेरीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नव्या बदलांप्रमाणे ता. 17 ऑगस्टपासून समुपदेशन फेरी सुरू करण्यात आली. या बदलामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 


औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशाची प्रक्रिया तीन जूनपासून सुरू आहे. औरंगाबादमधील आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी अकराशे 64 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेशाच्या प्रक्रियेत चार फेऱ्या पूर्ण झाल्या. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी आयटीआयमध्ये चौथ्या फेरीच्या समाप्तीनंतर रिक्त जागांसाठी 17 तारखेपासून समुपदेशन फेरी सुरु करण्यात आली आहे. 


ज्या विद्यार्थ्यांचे आयटीआयमध्ये प्रवेश निश्‍चित झाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी सोमवारी (ता.19) सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत येथील रेल्वे स्टेशन रोडवरील आयटीआयमध्ये रजिस्ट्रेशनची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या रजिस्ट्रेशननंतर त्याच दिवशी संध्याकाळी पाचनंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. त्या यादीनुसार पुढील तीन दिवस आयटीआयमध्ये स्पॉट ऍडमिशनची प्रक्रिया सुरु राहील. यासाठी पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता.20) एक ते पाचशे, बुधवारी (ता.21) पाचशे ते एक हजार, त्यानंतर गुरुवारी (ता.22) एक हजाराच्या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी समुपदेशन फेरी घेण्यात येईल. त्यानंतर प्रवेशासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी ता. 20 ते 23 ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहून सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर प्रवेश निश्‍चितीची कार्यवाही करायची आहे. 


या प्रवेश प्रक्रियेत उमेदवारांना जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमधील आयटीआयमध्ये प्रवेशासाठी नोंदणी करता येईल. निवडीनंतर उमेदवारांनी संबंधित तालुक्‍यांतील आयटीआयमध्ये जाऊन कागदपत्रांची पूर्तता करुन प्रवेश निश्‍चित करता येणार आहे. जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी संपल्यानंतर 24 ऑगस्टपासून शिल्लक राहिलेल्या जागांसंबंधीचा तपशील त्या-त्या संस्थांमार्फत प्रकाशित करण्यात येईल. 

 औरंगाबाद येथील शासकीय आयटीआयमधील रिक्त जागा 
रेल्वेस्टेशन रस्त्यावरील शासकीय आयटीआयमध्ये विविध प्रकारच्या 29 ट्रेडसाठी एक हजार 116 जागा आहेत. त्यापैकी 75 टक्के प्रवेश निश्‍चित झाले आहेत. तर 25 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामध्ये कारपेंटर 40, वेल्डर -22, फाऊंडरमॅन-24, मेसन-33, प्लंबर-14, इलेक्‍ट्रॉनिक मॅकेनिक-16, टूल ऍण्ड डायमेकर-16 या ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. उपलब्ध जागेसाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रा. ए. ए. अल्टे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com