फक्त एक वही भावासाठी... एक पुस्तक बहिणीसाठी...! 

संदीप लांडगे
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

औरंगाबाद-  पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी "फक्त एक वही भावासाठी... एक पुस्तक बहिणीसाठी' या शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या आवाहनाला  जिल्ह्यातील शाळांकडून उदंड प्रतिसाद मिळाला

औरंगाबाद-  पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी "फक्त एक वही भावासाठी... एक पुस्तक बहिणीसाठी' असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शालेय साहित्याचा ओघ सुरु झाला. गुरुवारी (ता.22) जमा झालेले ट्रकभर साहित्य मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्या उपस्थित सांगलीकडे रवाना करण्यात आले. 

"नका नका मला, देवू नका खाऊ,

वैरी पावसाने नेला माझा भाऊ,

भांडी कुंडी माझी, खेळणी वाहिली,

लाडली बाहूली जाताना पाहिली,

महापुरामध्ये घरदार गेलं,

जुलमी पावसाने माझे दप्तरही नेलं,

हिम्मत द्या थोडी, उसळू द्या रक्त,

पैसाबीसा नको, दप्तर द्या फक्त'..

कवी अशोक कोळी यांच्या या कवितेतून पूरपरिस्थितीची कल्पना येते. 
कोल्हापूर, सागंली, सातारा येथील महापूर ओसरला असला तरी; पुराबरोबर अनेकांचे सर्वस्व वाहून गेले. शाळा, शाळेची घंटा, मित्र, मैत्रिणी कुठे असतील? वह्या-पुस्तकांच्या "चिखला'कडे पाहाताना विद्यार्थ्यांचे अंतकरण भरुन येत असेल. काही दिवसांत शाळेकडून "शाळेत या!', असा सांगावाही येईल; पण दप्तर तर पुरात वाहून गेले. त्यामुळे शाळेत काय घेऊन जायचं? असे नानाविध प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडले आहेत. त्या मुलांच्या हाती दप्तर देऊन त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी "फक्त एक वही भावासाठी आणि एक पुस्तक बहिणीसाठी द्या' अशी साद शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जिल्ह्यातील शाळांना घातली होती.

प्रत्येक विद्यार्थ्याने पूरग्रस्त भावा-बहिणीसाठी एक वही, एक पुस्तक, कंपास आदी साहित्य आपल्या शाळेकडे जमा करावे. जमा साहित्य शाळांनी स्टेशनरोडवरील चेलीपुरा हायस्कूल येथे आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी सर्व शाळा मदतीसाठी धावून आल्या. अवघ्या चार दिवसात प्रत्येक शाळेतून मदतीचा मोठ्‌या प्रमाणात ओघ सुरु झाला. शेवटी शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण यांनी तालुकास्तरावरील शाळांना आपापल्या स्तरावरून मदत पाठवण्याचे आवाहन केले. 

पाठवलेले साहित्य 
रजिस्टर, वह्या- 75 हजार, दप्तर बॅग-444, कंपास, साहित्य -1 हजार, पेन-22 हजार 561, पेन्सिल-10 हजार, शार्पनर, खोडरबर-3800, रंगपेटी, चित्रकला वह्या-200, वर्कबूक-320, लंचबॉक्‍स, स्केल, स्केचपेन, पाट्या ः 1 हजार 

 
""पूरग्रस्तांसाठी औरंगाबादच्या शिक्षण विभागाने मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य जमा करुन पाठवले, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. तसेच तेथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर असू, असे आश्‍वासन देते.'' 
पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी 

उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. गुरुवारी एक ट्रक शालेय साहित्य पाठवले आहे. अजूनही मदतीचा ओघ सुरुच आहे. अजून एक ट्रक शालेय साहित्य लवकरच पाठवण्यात येणार आहे. 
-डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: about school