मुलांच्या जिवाशी खेळ सुरूच! 

संदीप लांडगे
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

शाळांमधील परिवहन समित्या कागदावरच, नियमबाह्य वाहतूक जोरात 

औरंगाबाद- विद्यार्थी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे अनिर्वाय आहे; मात्र अजूनही अनेक शाळांमध्ये ही समिती स्थापन झालेली नाही; तर बहुतांश शाळांमध्ये केवळ कागदोपत्रीच ही समिती असून, त्यांच्या बैठकाच होत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. 

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी, ते कोणत्या वाहनांतून शाळा, महाविद्यालयात येतात-जातात याची नोंद राहावी. यासाठी शासनाने 2011 मध्ये प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत शालेय परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते; मात्र अनेक रिक्षामध्ये चालकांच्या दोन्ही बाजूला विद्यार्थी बसवले जातात. पाठीमागे समोरासमोर दोन फळ्या टाकून तेथे आठ मुले कोंबून बसविले जातात. बहुतांश रिक्षाच्या दोन्ही बाजूंना आधारही नसतो. अनेक चालक वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन करीत सर्रास मोबाईलवर बोलत असतात. काही चालक शाळा भरण्यापूर्वी 11 ते 12 या वेळेत दोन ट्रिप पूर्ण करण्यासाठी वेगात वाहन चालवून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळतात. 

शहराचे विस्तारीकरण झाल्याने अनेक शाळा शहरापासून दूर आहेत. घरापासून शाळा लांब असल्यास स्कूल बसशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मिनीबसमध्ये आठ विद्यार्थी बसण्याची क्षमता असताना 15 पेक्षा जास्त तर तीन सीटच्या रिक्षात आठ-दहा मुले कोंबून बसविले जातात. रिक्षाच्या बाहेर मुलांचे दप्तर, पिशव्या धोकादायक पद्धतीने लटकवल्या जातात. त्यामुळे अपघात झाला तर कोण जबाबदार? सुरक्षित प्रवासासाठी शाळा, पालक यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. 

शालेय परिवहन समितीचे काम 
-विद्यार्थी वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवणे 
-चुकीचे प्रकार घडत असल्यास ते उघड करणे 
-मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे 
-स्पीड गव्हर्नर बसवण्यात आल्याने वेगाला मर्यादा येतात. (महापालिका क्षेत्रात 40 तर बाहेर 50 किमी प्रति तास वेग) 

पालकांनी काय करावे? 
विद्यार्थी पालकांसमोरच वाहनात बसतो. वाहनात विद्यार्थी संख्या जास्त आहे का, त्याची अंतर्गत रचना कशी आहे हे पालक पाहू शकतात. संबंधित वाहनचालक नियमानुसार विद्यार्थी वाहतूक करीत नसेल तर पालकांनी याची माहिती शाळेला द्यावी. शाळेकडून दखल घेतली नाही तर आरटीओ प्रशासनाला संबंधित वाहनक्रमांक द्यावा

अशी असते परिवहन समिती 
शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष संबंधित शाळेचे मुख्याध्यापक असतील. शाळा ज्या परिसरात आहे, तेथील वाहतूक पोलिस निरीक्षक अथवा ठाण्याचे पोलिस निरीक्षक हे सदस्य असतील. तसेच आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक, पालक संघाचे प्रतिनिधी, विद्यार्थी वाहतूक संघटनेचा प्रतिनिधी असे सर्व मिळून शालेय परिवहन समिती तयार होते. 

स्कूलबससाठी नियमावली 
0स्कूलबसची यांत्रिक स्थिती उत्तम असावी 
0बसेस पिवळ्या रंगाच्या असतील 
0बसच्या मागेपुढे "स्कूलबस' असे लिहावे, 
0बसायला खुर्च्या पाहिजेत; खिडकीला जाळी पाहिजे 
0चढण्या-उतरण्याची जमिनीपासून उंची नियमानुसार असावी, 
0बसच्या दोन्ही बाजूला बहिर्वक्र भिंगाचे आरसे असावे 
0दरवाज्याच्या पायरीसोबत आधारासाठी दांडा असावा 
0सुसज्य प्रथमोचार पेटी, अग्निशमन उपकरणे असावी 
0वाहनाचा वेग ताशी 40 किमी असावा. त्यासाठी वेग नियंत्रक हवे 
0निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नसावेत 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: about school