शाळाबाह्य मुलांचा सुरु होणार शोध

संदीप लांडगे
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती ः बालरक्षकांची सोमवारपासून कार्यशाळा

औरंगाबाद-  आर्थिक चणचण, मोलमजुरी, ऊसतोडी अशा विविध कारणांमुळे दरवर्षी अनेक मुले शाळेपासून दूर जातात. या मुलांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून ऑक्‍टोबरपासून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवारपासून (ता. 30) बालरक्षकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. 

विविध कारणांमुळे शाळा सोडणाऱ्या मुलांना पुन्हा शाळांमध्ये आणण्यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जातात. शालेय कामकाज सांभाळून शिक्षकांकडून शाळा परिसरातील 3 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येतो. हा शोध घेताना बालरक्षकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मुलाला शाळेत आणण्यासाठी त्याच्या पालकांची, नातेवाइकांची समजूत काढणे, विद्यार्थी कोणत्याही त्रासाशिवाय शाळेत यावा यासाठी पोषक वातावरण तयार करणे.

 

अशा अनेक समस्यांचा सामना करीत शिक्षक ऑक्‍टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणतात. शिक्षणापासून वंचित बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यंदा जिल्ह्यातील सुमारे दोनशे शिक्षकांना बालरक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

या तालुक्‍यांतून जास्त शाळाबाह्य मुले 
दरवर्षी पैठण, वैजापूर, सोयगाव, कन्नड या तालुक्‍यांतून मोठ्या प्रमाणात अनेक लोक ऊसतोड, मजुरी, वीटभट्टीच्या कामासाठी स्थलांतर करतात. त्यांच्या स्थलांतरामुळे मुलांना अर्धवट शिक्षण सोडून पालकांसोबत जावे लागते. परिणामी, या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्ध्यातच थांबते. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते. याच मोहिमेंतर्गत मागील वर्षी शिक्षण विभागाने तब्बल दोन हजार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: about school