उत्तरपत्रिका मूल्यमापनाच्या  मानधनात वाढ करावी 

संदीप लांडगे
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनासाठी देण्यात येणारे मानधन अगदी तुटपुंजे असते. त्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनी केली आहे. याबाबत माध्यमिक परीक्षा मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांना निवेदन देण्यात आले. 

औरंगाबाद -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनासाठी देण्यात येणारे मानधन अगदी तुटपुंजे असते. त्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनी केली आहे. याबाबत माध्यमिक परीक्षा मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांना निवेदन देण्यात आले. 

शिक्षण मंडळाकडून दरवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. विभागातील सर्व उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मंडळातर्फे शिक्षकांना पत्र दिले जातात. पेपर तपासण्यासाठी मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून शिक्षक येतात. त्यांना परीक्षा मंडळाकडून अत्यल्प प्रमाणात मानधन दिले जाते. त्यामध्ये काउंटर फोलिओसाठी प्रतिपेपर दहा पैसे, परीक्षणासाठी अडीच रुपये, नियमन करण्यासाठी दीड रुपया, हमाली 50 रुपये, स्थानिक भत्ता शंभर रुपये तसेच दिवसभराच्या नाश्‍ता-भोजनासाठी केवळ 110 रुपये, मुक्कामी थांबायचे असल्यास हॉटेलचे भाडे 130 रुपये दिले जाते. हॉटेलमध्ये राहण्यासाठी किमान पाचशे रुपये लॉजचे दर आहेत.

पेपर तपासण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या शिक्षकांना हा दर परवडत नाही. त्यामुळे अनेक शिक्षक दरवर्षी पेपर तपासणीच्या कामाची टाळाटाळ करतात. शिक्षकांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी. त्यात काउंटर फोलिओसाठी एक रुपया, परीक्षणासाठी पाच रुपये, नियमनासाठी तीन रुपये, भोजन भत्ता दीडशे रुपये, निवासी भत्ता अडीचशे रुपये, हमाली शंभर रुपये व स्थानिक भत्ता दोनशे रुपये करावा; तसेच प्रवासासाठी साध्या बसऐवजी एशियाड बसची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

तसेच उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे मानधन पूर्वी निकालाबरोबरच धनादेश मिळत होते. मात्र, सध्या ऑनलाइन मानधन प्राप्त होण्यासाठी जास्तीचा कालावधी लागत आहे. त्यामुळे त्वरित मानधन खात्यात जमा करावे, अशी मागणी रामेश्‍वर जाधव, श्रीकांत कुलकर्णी, पूजा सक्‍सेना, रोहिणी कदम, साधना चव्हाण आदींनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About SSC board