लातुरात शिवभोजन थाळीची पार्सल सेवा जोरात,सव्वातीन लाख जणांची भागवली भूक

विकास गाढवे
Tuesday, 8 September 2020

गरजूंना पाच रूपयात पोटभर भोजन देण्याच्या राज्य सरकारच्या शिवभोजन थाळी योजनेला लातूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योजनेतील केंद्रातून जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली पार्सल सेवा तर जोरात चालली. यामुळे या योजनेतून गरजूंची भूक भागली.

लातूर : गरजूंना पाच रूपयात पोटभर भोजन देण्याच्या राज्य सरकारच्या शिवभोजन थाळी योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योजनेतील केंद्रातून जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली पार्सल सेवा तर जोरात चालली. यामुळे या योजनेतून गरजूंची भूक भागली. याशिवाय केंद्रचालकांनी उद्दिष्टाची मर्यादा ओलांडून पार्सल सेवेतून थाळीभोजन दिले. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल सव्वातीन लाख लाभार्थींनी योजनेचा लाभ घेतला असून जिल्ह्यातील बहुतांश केंद्र पूर्ण क्षमतेने थाळीभोजन वाटपाचे काम करत असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी गृह विलगीकरणाची कास, का वाचा

गरजूंना दहा रूपयात पोटभर भोजन देण्याच्या शिवभोजन थाळी योजना जिल्ह्यात २६ जानेवारीपासून सुरू झाली आहे. सुरूवातीला जिल्हा मुख्यालय असलेल्या केवळ शहरातच असलेल्या योजनेची व्याप्ती लॉकडाऊनच्या काळात जिल्हाभरात वाढवली. २६ जानेवारी ते ३१ मार्च या काळात थाळीभोजनाचा दर दहा रूपये होता. लॉकडाऊनमुळे सरकारने थाळीची किंमत पाच रूपये केली. या योजनेत शहरी भागातील केंद्रचालकांना थाळीमागे प्रत्येकी चाळीस तर ग्रामीण भागात तीस रूपये अनुदान देण्यात येते.

लातूर, अहमदपूर व उदगीर येथील केंद्रांचा समावेश शहरी भागात होतो तर उर्वरित सर्व केंद्र ग्रामीण भागात येतात. जिल्ह्यात थाळी भोजनाची सध्या १९ केंद्र असून सर्व केंद्रांना मिळून दररोज दोन हजार थाळीचे उद्दिष्ट मंजूर आहे. पूर्वी केंद्रांत बसून लाभार्थींना थाळी भोजनाचा आस्वाद घेता येत होता. कोरोनामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केंद्र बंद न करता केंद्रातून पार्सल सेवा सुरू ठेवली. याचा मोठा फायदा गरजू व्यक्तींना झाला. कोरोनामुळे सर्वत्र हॉटेल बंद असल्याने भोजनाचे वांदे झाले होते. पार्सल सेवेमुळे गरजूंची सोय झाली.

लॉकडाऊनच्या काळात मध्यंत्तरी काही दिवस ही केंद्र राहिली तरी उर्वरित कालावधीत केंद्रांतून थाळीची पार्सल सेवा जोरात सुरू राहिली. यातूनच सर्वच केंद्रांनी त्यांना दिलेल्या रोजच्या उद्दिष्टापेक्षा जास्त संख्येने थाळीचे वितरण केले. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख २४ हजार ४९५ जणांनी थाळी भोजनाचा आस्वाद घेतला असून त्यापैकी दोन लाख ६५ हजार ७१९ थाळींचे अनुदान मंजूर केल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या सुत्रांनी सांगितले.     

मराठवाड्यातील जिल्ह्यांनी कोरोनाचा खर्च कसा केला, हिशेबाला झाली सुरवात

जादा थाळीच्या अनुदानाची मागणी
हॉटेल बंद असल्यामुळे शिवभोजन केंद्रांतून थाळीला मोठी मागणी झाली. यात पार्सल सेवेमुळे लाभार्थींची सोय झाली. यामुळे थाळीची विक्री जोरात झाली. यातूनच सर्वच केंद्रांना त्यांना नेमून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त थाळीची विक्री करावी लागली. जिल्ह्यात तब्बल ५८ हजार ७७६ थाळींची उद्दिष्टापेक्षा जास्त विक्री झाली असून त्यासाठीच्या अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे नोंदवली आहे. लॉकडाऊनच्या काळात दिलेल्या भोजनसेवेचा हा निधी सरकारकडून मिळण्याची आशा केंद्रचालकांना आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Above Three Lakh People Get Shivbhojan In Latur