इलेक्‍शनच्या प्रशिक्षणाला दांडी सुरूच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

बदनापुरात पुन्हा साठजण गैरहजर, नोटिसा बजावणार

बदनापूर (जि.जालना) -  बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. 29) प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, या प्रशिक्षणाला 920 पैकी 860 कर्मचारी हजर होते. तर तब्बल 60 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. दरम्यान, शनिवारी (ता. 28) झालेल्या निवडणूक प्रशिक्षणालाही 53 कर्मचारी गैरहजर होते. दोन दिवस स्वतंत्ररीत्या घेतलेल्या प्रशिक्षणाला 113 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. प्रशासनाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येणार आहे. 
येथील चाणक्‍य मंगल कार्यालयात या दोन्ही दिवसांचे निवडणूक प्रशिक्षण चार टप्प्यांत पार पडले. रविवारी दुसऱ्या दिवशीच्या प्रशिक्षणाला सकाळी दहा ते एक कालावधीत 460 कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. यात 435 हजर तर 25 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. तर दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंतच्या प्रशिक्षणाला 460 पैकी 425 हजर, तर 35 कर्मचारी गैरहजर होते. एकूणच रविवारी निवडणूक प्रशिक्षणाला 920 पैकी 860 जण हजर, तर 60 जण गैरहजर होते. या प्रशिक्षण शिबिरात मतदान अधिकारी व केंद्रध्यक्षांना मतदानाची प्रक्रिया प्रभावी राबविण्याची सूचना निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी व सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार छाया पवार यांनी दिली. 

भोकरदनला तीस जणांची प्रशिक्षणाकडे पाठ 
भोकरदन -  येथील पहिल्याच निवडणूक प्रशिक्षणाला तीस कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविली. या दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली. 
भोकरदन येथील मॉडर्न स्कूलच्या इमारतीत शनिवारी (ता. 28) व रविवारी (ता.29) दोनदिवसीय निवडणूक प्रशिक्षण घेण्यात आले होते. सकाळी दहा ते एक व दुपारी दोन ते पाच अशा दोन सत्रांत विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी व मतदान आधिकाऱ्यासाठी निवडणूक प्रशिक्षण झाले. यावेळी निवडणूक निर्णय आधिकारी शिवकुमार स्वामी, सहायक निवडणूक निर्णय आधिकारी संतोष गोरड, जाफराबादचे तहसीलदार सोनी यांच्यासह सर्व आधिकारी उपस्थित होते. नियुक्त कर्मचारी व मतदानाधिकाऱ्याना मतदान यंत्र हाताळणे, मतदान अधिकाऱ्यांचे कार्य याचे प्रशिक्षण देण्यात आले. शनिवार व रविवारी दोन दिवस मिळून एकूण 30, कर्मचारी गैरहजर राहिले. या सर्व गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत. 

विधानसभा निवडणुकीचे जालन्यात प्रशिक्षण 
जालना -  विधानसभा निवडणुकीसाठी जालना तालुक्‍यातील दोन हजारपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांना मतदान यंत्रासह विविध यंत्रांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण रविवारी (ता. 29) देण्यात आले. शहरातील सेंट मेरी इंग्लिश स्कूल येथे दोन दिवसांपासून निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. रविवारी (ता. 29) एक हजार अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. दोन सत्रांत दहा विविध गटांनुसार प्रशिक्षण पार पडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absent to election training