अडीच हजारांची लाच स्वीकारणारा कृषी अधिकारी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नांदेड : शेतातील शेडनेटसाठी एका शेतकऱ्यांकडून अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी सहाय्यकास लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (ता. १३) रंगेहात पकडले. हा सापळा धर्माबाद कृषी कार्यालयात टाकला. 

नांदेड : शेतातील शेडनेटसाठी एका शेतकऱ्यांकडून अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी सहाय्यकास लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (ता. १३) रंगेहात पकडले. हा सापळा धर्माबाद कृषी कार्यालयात टाकला. 

धर्माबाद तालुक्यातील एक शेतकरी हा धर्माबाद कृषी कार्यालयात आपल्या शेतात शेडनेट टाकण्याचा प्रस्ताव घेऊन गेला. हा प्रस्ताव त्याने दाखल केला. अनेक वेळा मंजुरीसाठी खेटे मारले. परंतु त्यांचा प्रस्ताव काही केल्या मंजूर होत नव्हता. अखेर त्रस्त शेतकरी कृषी सहाय्यक (तांत्रिक) मुरलीधर गंगाधर चटलावार यांच्याकडे गेला. यावेळी लाचखोर चटलावार यांनी त्यांना हा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कार्यालयात पाठविण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली. परंतु ही लाच देण्याची इच्छा नसलेल्या शेतकऱ्यांनी तडजोड अंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरविले. लगेच त्यांनी नांदेड गाठून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली.

पथकांनी पोलिस उप-अधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पडताळणी सापळा लावला. धर्माबाद कृषी कार्यालयात लावलेल्या सापळ्यात मुरलीधर चटलावार हा अडीच हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले. पोलिस निरीक्षक कपील शेळके यांच्या फिर्यादीवरुन धर्माबाद ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय लाटकर, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कपील शेळके, पोलिस साजीद अली, जगन्नाथ अनंतवार, शिवाजी पवार, सुरेश पांचाळ आणि नरेंद्र बोडके यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Accepting bribe of rupees two and a half thousand Agriculture Officer Trapped